इफ्फी 2026: ‘सिनेमॅन’ आणि ‘तिघी’ची निवड, मराठी सिनेम्याचा जागतिक पटलावर डंका!

गोव्यात होणाऱ्या ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) यंदा मराठी चित्रपटांचा दणका आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने ‘सिनेमॅन‘ आणि ‘तिघी‘ अशा दोन वेगळ्या आशयाच्या मराठी चित्रपटांची निवड केली आहे.

दोन्ही चित्रपटांच्या निवडीमुळे मराठी सिनेम्याचे आशय वैविध्य आणि प्रभावी कथनाची परंपरा आंतरराष्ट्रीय पटलावर मांडता येणार आहे.

‘सिनेमॅन’ हा उमेश मोहन बागडे दिग्दर्शित चित्रपट आहे. दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत अर्थपूर्ण चित्रपट पोहोचवायचा ध्यास घेतलेल्या आनंद या निवृत्त शिक्षकाच्या प्रेरणादायी कार्याभोवती ही कथा फिरते.

मुलांमध्ये चित्रपटांची जाणिव निर्माण करण्यासाठी त्याने सुरू केलेल्या उपक्रमाचा मागोवा एक तरुण चित्रपटकर्मी घेतो. या प्रवासात मुलांची कल्पनाशक्ती, बालविश्व आणि जागतिक सिनेमाशी जोडणारा रंजक अनुभव उलगडतो.

दुसरीकडे, ‘तिघी’ हा जिजीविषा काळे दिग्दर्शित चित्रपट आई आणि तिच्या दोन मुलींच्या गुंतागुंतीच्या नात्यांचा भावनिक वेध घेतो. आईच्या आजारपणामुळे अनेक वर्षांपासून दुरावलेल्या दोन बहिणी पुन्हा एकत्र येतात.

त्यातून जुन्या आठवणी, मनातील सल, नात्यांतील ताण आणि कुटुंबात दडलेली रहस्ये समोर येतात. भारती आचरेकर, नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २३ नोव्हेंबरला महोत्सवात दाखवला जाणार आहे.

महामंडळाचा हा सहभाग फक्त प्रदर्शनापुरता मर्यादित नाही. महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती, सांस्कृतिक वैविध्य आणि चित्रीकरणाच्या पायाभूत सुविधांचे सामर्थ्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे.

महोत्सवात महामंडळाचे स्वतंत्र दालनही उभारले जाणार आहे. यात एन. डी. स्टुडिओ आणि कोल्हापूर चित्रनगरीचाही सहभाग असणार आहे.

या दालनातून राज्यातील चित्रपटगृहे, चित्रीकरण स्थळे, तांत्रिक सुविधा आणि निर्मितीविषयक संधींची माहिती देश-विदेशातील निर्माते, दिग्दर्शक आणि संस्थांना दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील विविध केंद्रांची क्षमता एकाच व्यासपीठावर मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

महामंडळाचे हे दालन केवळ माहिती देणारे न राहता, आंतरराष्ट्रीय निर्मिती आणि संस्थांना महाराष्ट्रात चित्रीकरणाकडे आकर्षित करणारे व्यासपीठ ठरणार आहे.

मुंबई हे भारतीय चित्रपटसृष्टीचे महत्त्वाचे केंद्र असले तरी राज्यातील विविध भागांतही चित्रपट निर्मितीच्या संधी वाढत आहेत. चित्रपटगृहे, नैसर्गिक व बंदिस्त चित्रीकरण स्थळे, तांत्रिक मनुष्यबळ, निर्मितीपश्चात सेवा आणि स्थानिक कलावंतांच्या उपलब्धतेवर भर देऊन राज्य शासन व्यापक चित्रपट परिसंस्था उभारण्याच्या प्रयत्नात आहे.

जगभरातील चित्रपट निर्मिती, प्रशिक्षण संस्था, तंत्रज्ञ आणि विविध देशांचे प्रतिनिधी या महोत्सवात एकत्र येतात. महाराष्ट्राला अधिक सक्षम, आकर्षक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक केंद्र म्हणून पुढे आणण्यासाठी हा सहभाग महत्त्वाचा ठरेल.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page