पोलिस स्टेशन, एक सामान्य माणूस अन् मोठं गूढ, ‘F.I.R. NO. 469’ 22 जानेवारीला

मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेता किरण गायकवाड आता दिग्दर्शनातही आपली छाप उमटवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘F.I.R. NO. 469’ हा आगामी सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून, त्यातून कथेबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

‘F.I.R. NO. 469’ हा चित्रपट 22 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून सत्ता, पैसा, राजकारण, गुन्हे, पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाच्या जाळ्यात अडकलेल्या एका सर्वसामान्य माणसाची कथा मांडण्यात आली आहे.

बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि आनंदी एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचे निर्माते निलेश राठी, प्राची राऊत आणि सचिन अग्रवाल आहेत. अर्चना नरेश भुतडा सहनिर्मात्या असून त्र्यंबक डागा आणि मोहसीन खान सहयोगी निर्माते आहेत.

चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन किरण गायकवाड यांनी केलं आहे. छायांकनाची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली आहे.

पोस्टरमध्ये एका पोलिस स्टेशनमध्ये हतबल अवस्थेत बसलेला सामान्य माणूस दिसतो. त्याच्या चेहऱ्यावरील भाव आणि आजूबाजूचं वातावरण पाहता, तो कोणत्या संकटात सापडला आहे, असा प्रश्न निर्माण होतो. पोस्टरच्या पार्श्वभूमीवर असलेलं ‘सत्यमेव जयते’ हे वाक्यही विशेष लक्ष वेधून घेतं.

पोस्टरमधूनच सामान्य माणूस आणि व्यवस्थेतील संघर्षाची झलक मिळते. मात्र, त्याच्यासोबत नेमकं काय घडलं आहे आणि F.I.R. क्रमांक 469 मागचं रहस्य काय आहे, याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही.

चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. नचिकेत पूर्णपात्रे, प्रसाद ओक, अमृता धोंगडे, राहुल मगदूम, निखिल चव्हाण, हार्दिक जोशी, अंकिता लांडे आणि देवेंद्र गायकवाड यांचा यात समावेश आहे.

याशिवाय रमेश परदेशी, सुहास शिरसाट, योगेश शिरसाट, चेतन चावडा, अंजली जोगळेकर, अंकुश मांडेकर, मीरा सारंग आणि चेतन रायकर हे कलाकारही चित्रपटात आहेत.

किरण गायकवाड यांच्या मते, ‘F.I.R. NO. 469’ ही कॉमन मॅनची गोष्ट आहे. नाट्यमय घटनांमधून ही कथा पुढे सरकते आणि त्यातून समाजातील विविध पैलू समोर येतात. प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत कथेशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेल्या किरण गायकवाड यांचं दिग्दर्शक म्हणून हे पहिलं पाऊल आहे. त्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनाची शैली आणि सामान्य माणसाच्या संघर्षावर आधारित या सस्पेन्स-थ्रिलरला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता लक्ष लागलं आहे.

‘F.I.R. NO. 469’ 22 जानेवारीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page