चेंगलपट्टू जिल्हा कौटुंबिक न्यायालयात या प्रकरणावर यापूर्वी तीन वेळा सुनावणी झाली होती. 7 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान संगीता यांनी घटस्फोटाचं प्रकरण पुढे न नेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली आणि प्रकरणाची पुढील कार्यवाही थांबवली.
संगीता यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये Special Marriage Act, 1954 अंतर्गत घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. मात्र काही महिन्यांनंतर त्यांनी अचानक ही याचिका मागे घेतल्याने आता त्यांच्या निर्णयामागचं कारण काय, याची चर्चा सुरू झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय यांच्या आई शोभा चंद्रशेखर यांनी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं जात आहे. शोभा चंद्रशेखर यांनी संगीता यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली आणि कुटुंबातील नातं टिकवण्यासाठी त्यांची समजूत काढल्याचा दावा केला जात आहे.
या चर्चेनंतरच संगीता यांनी घटस्फोटाचा निर्णय बदलल्याचं काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. मात्र या दाव्याबाबत संगीता किंवा विजय यांच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, घटस्फोटाची याचिका दाखल करताना संगीता यांनी विजय यांच्यावर काही गंभीर आरोप केल्याचंही वृत्त होतं. रिपोर्ट्सनुसार, विजय यांचे 2021 पासून दुसऱ्या एका महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हे संबंध संपवण्याचं आश्वासन विजय यांनी दिलं होतं, मात्र त्यानंतरही परिस्थितीत बदल झाला नसल्याचा दावा करण्यात आला.
यामुळे दोघांमध्ये मतभेद वाढल्याचं सांगितलं जात होतं. संगीता यांनी मानसिक छळ आणि पतीकडून साथ मिळत नसल्याचेही आरोप केल्याचं रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती.
आता मात्र याचिका मागे घेतल्याने या प्रकरणाला तात्पुरता पूर्णविराम मिळाला आहे. संगीता यांनी नेमका कोणत्या कारणामुळे निर्णय बदलला, याबाबत त्यांनी अद्याप सार्वजनिकपणे काहीही स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
