इन्स्टाग्रामवरील ‘नाटकवेडा मराठी माणूस’ या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये संजय नार्वेकर, चेतना आणि इतर कलाकार नाटकासाठी लागणारे फर्निचर व सेटचे साहित्य स्वतः उचलून रंगमंचावर मांडताना दिसत आहेत.
माहितीनुसार, 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकांमुळे पुण्यात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहात रात्री 9.30 वाजता होणाऱ्या ‘भ्रमाचा भोपळा’च्या प्रयोगासाठी नेपथ्य घेऊन येणारी बस जवळपास दोन तास रस्त्यात अडकून पडली.
दरम्यान, कलाकार मात्र वेळेत नाट्यगृहात पोहोचले होते. नेपथ्य उशिरा येणार असल्याचे स्पष्ट होताच संजय नार्वेकर यांनी रंगमंचावर येऊन प्रेक्षकांशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्या या प्रामाणिक भूमिकेमुळे प्रेक्षकांनीही संयम राखत कलाकारांना पूर्ण सहकार्य केले.
अखेर रात्री 10.03 वाजता नेपथ्याची बस नाट्यगृहात पोहोचली. त्यानंतर संपूर्ण टीमने वेळ न दवडता स्वतःच सेटचे साहित्य उचलून नेपथ्य उभारण्यास सुरुवात केली. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे अवघ्या काही वेळात तयारी पूर्ण झाली आणि रात्री 10.40 वाजता नाटकाचा प्रयोग सुरू झाला.
या घटनेनंतर कलाकारांच्या समर्पणाचे आणि जिद्दीचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. वाहतूक कोंडीसारख्या अडचणीवर मात करत प्रेक्षकांसाठी प्रयोग यशस्वीपणे सादर केल्याने ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
