यंदाच्या नामांकनांमध्ये ‘दशावतार’ चित्रपटाने सर्वाधिक 22 नामांकने मिळवत आघाडी घेतली आहे. त्यानंतर ‘आता थांबायचं नाय!’ आणि ‘गोंधळ’ या दोन्ही चित्रपटांना प्रत्येकी 19 नामांकने मिळाली आहेत. तर ‘एप्रिल मे 99’ या चित्रपटाला 17 विभागांत नामांकन मिळाले आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासाठी ‘एप्रिल मे 99’, ‘आता थांबायचं नाय!’, ‘दशावतार’, ‘फसक्लास दाभाडे’, ‘जारण’ आणि ‘स्थळ – अ मॅच’ या चित्रपटांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) विभागात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भारत जाधव, ललित प्रभाकर, अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर यांना नामांकन मिळाले आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) विभागात रेणुका शहाणे, अमृता सुभाष, सई ताम्हणकर, हृता दुर्गुळे आणि साजिरी जोशी यांचा समावेश आहे.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या विभागात हेमंत ढोमे, जयंत दिगंबर सोमळकर, रोहन मापुसकर, ऋषिकेश के. गुप्ते, शिवराज वायचळ आणि सुबोध खानोलकर यांच्यात स्पर्धा होणार आहे. समीक्षकांच्या सर्वोत्तम चित्रपट विभागात ‘देवमाणूस’, ‘गोंधळ’, ‘सबर बॉन्डा’, ‘स्थळ – अ मॅच’, ‘तीन पायांचा घोडा’ आणि ‘उत्तर’ या चित्रपटांना स्थान मिळाले आहे. तसेच सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक या विभागातही अनेक नवोदित दिग्दर्शकांची निवड झाली आहे.
नामांकनांची घोषणा मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी फिल्मफेअरचे एडिटर-इन-चीफ जितेश पिल्लई आणि अभिनेत्री अमृता खानविलकर उपस्थित होत्या. यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ करणार असून, हा सोहळा लवकरच सोनी मराठीवर प्रसारित केला जाणार आहे.
यावेळी अमृता खानविलकर यांनी फिल्मफेअर पुरस्कार हा प्रत्येक कलाकारासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. तर जितेश पिल्लई यांनी मराठी चित्रपटसृष्टीने दर्जेदार कथा, प्रभावी अभिनय आणि उत्कृष्ट तांत्रिक कामगिरीच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगत सर्व नामांकितांचे अभिनंदन केले. 6 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या सोहळ्यात यंदाच्या सर्वोत्तम चित्रपट आणि कलाकारांचा गौरव केला जाणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
