मुसळधार पावसामुळे एका रात्रीत संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाल्याची ही सत्य घटना आहे. पावसाची प्रार्थना करून शांत झोपलेल्या गावकऱ्यांवर मध्यरात्री संकट कोसळले आणि काही क्षणांत अनेकांचे आयुष्य कायमचे बदलून गेले. या घटनेची वेदना आणि त्यानंतरची परिस्थिती चित्रपटातून वास्तववादी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘एक होतं माळीण’ या चित्रपटाची निर्मिती संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी केली आहे. रुपेश राणे, अरुण कोंजे, दत्तात्रय गायकर आणि राजू राणे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, संकल्पना आणि पटकथा राजू राणे यांची असून, दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
या चित्रपटासाठी दिग्दर्शकांनी माळीण गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. दुर्घटनेचा अनुभव घेतलेल्या लोकांकडून माहिती घेऊन शक्य तितक्या वास्तवदर्शी पद्धतीने कथानक उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण बदलापूर येथे करण्यात आले आहे. माळीण गावाचा सेट कला दिग्दर्शक नितेश नांदगावकर यांनी उभारला असून तो चित्रपटातील विशेष आकर्षण ठरणार आहे. वास्तववादी सेट, प्रभावी व्हीएफएक্স आणि पार्श्वसंगीतामुळे टीझर अधिक प्रभावी वाटतो.
चित्रपटात प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक आणि अनुज ठाकरे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
याशिवाय युवराज गोंगले यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केले असून अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी आणि हरिदास शिंदे यांच्या आवाजातील गाणीही चित्रपटात ऐकायला मिळणार आहेत.
टीझरमध्ये भीषण नैसर्गिक आपत्तीची झलक, गावकऱ्यांची धडपड आणि संकटाच्या काळातील भावनिक क्षण प्रभावीपणे दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे ‘एक होतं माळीण’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या इतिहासातील एका वेदनादायी घटनेची आठवण पुन्हा जागवणारा ठरण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
