मिलिंद सोमण यांनी जगातील सर्वात आव्हानात्मक जलमार्गांपैकी एक मानल्या जाणाऱ्या जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहत पार केली. हा समुद्री मार्ग युरोप आणि आफ्रिका या दोन खंडांना वेगळं करतो. या प्रवासात त्यांनी अंदाजे 15 किलोमीटरचं अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं.
या कामगिरीची माहिती त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली. 1 मे रोजी स्पेनमधील तारीफा येथून सुरुवात करत त्यांनी मोरोक्कोच्या किनाऱ्यापर्यंत पोहत प्रवास पूर्ण केला. समुद्रातील जोरदार प्रवाह, बदलत्या लाटा आणि जहाजांची मोठी वर्दळ यामुळे हा मार्ग अत्यंत कठीण मानला जातो.
या अभूतपूर्व कामगिरीनंतर जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. फिटनेससाठी ओळख असलेल्या मिलिंद यांनी पुन्हा एकदा स्वतःची जिद्द आणि शारीरिक क्षमता दाखवून दिली आहे.
याआधीही त्यांनी अनेक कठीण आव्हाने पूर्ण केली आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी गोव्यात 20 किलोमीटरचं सागरी पोहणं पूर्ण केलं होतं. हे अंतर पार करण्यासाठी त्यांना सुमारे आठ तास लागले होते.
इतकंच नाही, तर मुंबई ते गोवा हा सुमारे 600 किलोमीटरचा प्रवासही त्यांनी धावत आणि सायकल चालवत पूर्ण केला होता. त्यासाठी त्यांना पाच दिवस लागले होते. अनवाणी पायांनी धावण्याची त्यांची शैलीही अनेकदा चर्चेत राहिली आहे.
फिटनेस, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर मिलिंद सोमणचा विक्रम आता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
