यशच्या अभिनयाचं आणि त्याच्या स्क्रीन प्रेझेन्सचं अनेक प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. ॲक्शन सीन्स, सिनेमाचा भव्य लूक आणि काही महत्त्वाचे प्रसंग प्रेक्षकांना आवडल्याचं दिसत आहे. विशेषतः यशची एन्ट्री आणि त्याचा स्वॅग सोशल मीडिया यूजर्सच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
काही प्रेक्षकांनी दिग्दर्शक गीतू मोहनदास यांच्या दिग्दर्शनाचं आणि चित्रपटाच्या तांत्रिक बाजूचंही कौतुक केलं. सिनेमॅटोग्राफी, ॲक्शन आणि मोठ्या पडद्यावर दिसणारा स्केल या गोष्टींनी प्रभावित केल्याच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
मात्र, ‘टॉक्सिक’ला सर्वच प्रेक्षकांनी पसंती दिलेली नाही. कथा आणि पटकथा हा चित्रपटातील सर्वाधिक चर्चेचा नकारात्मक मुद्दा ठरला आहे. काही नेटकऱ्यांच्या मते, कथा विस्कळीत वाटते आणि अनेक प्रसंगांमध्ये भावनिक जोड निर्माण होत नाही. चित्रपटाची लांबी आणि एडिटिंगवरही काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काही सोशल मीडिया यूजर्सनी चित्रपटाची तुलना यशच्या ‘KGF’शीही केली आहे. ‘टॉक्सिक’मध्ये यशचा लूक, स्वॅग आणि ॲक्शन प्रभावी असले तरी त्याच्या आधीच्या चित्रपटाची छाप काही भागांमध्ये जाणवते, असं काहींचं मत आहे.
विशेष म्हणजे, काही प्रेक्षकांनी पहिला भाग आवडल्याचं सांगितलं आहे, तर काहींना दुसरा भाग अपेक्षेप्रमाणे प्रभावी वाटला नाही. त्यामुळे चित्रपटाबाबत सध्या सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
‘टॉक्सिक’ला ‘A’ प्रमाणपत्र मिळालं असून चित्रपटात हिंसक आणि प्रौढ प्रेक्षकांसाठी असलेलं कंटेंट आहे. यामुळे चित्रपटातील काही इंटिमेट सीन्सवरही सोशल मीडियावर चर्चा झाली आहे.
दिग्दर्शक गीतू मोहनदास यांच्या या चित्रपटात यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या भूमिका आहेत. यशच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट खास आहे, कारण ‘KGF: Chapter 2’नंतर तो पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर परतला आहे.
एकूणच, पहिल्या दिवसाच्या प्रतिक्रियांनुसार ‘टॉक्सिक’मध्ये यशचा अभिनय, ॲक्शन आणि भव्य दृश्यांना चांगली दाद मिळत आहे. मात्र, कथा, पटकथा, एडिटिंग आणि चित्रपटाच्या लांबीबाबत प्रेक्षकांमध्ये नाराजीही आहे. त्यामुळे ‘टॉक्सिक’ पास की फेल, याचं अंतिम उत्तर देण्यासाठी आणखी काही दिवसांची बॉक्स ऑफिस कामगिरी आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
