Sulakshana Pandit: बॉलिवूडसह संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचं वयाच्या ७१व्या वर्षी निधन झालं. गुरुवारी रात्री मुंबईतील नानावटी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ललित पंडित यांनी ही माहिती दिली. त्यांचा अंत्यसंस्कार ७ नोव्हेंबर रोजी दुपारी पार पडणार आहे.
सुलक्षणा पंडित यांनी केवळ अभिनयातूनच नव्हे तर आपल्या मधुर आवाजातूनही प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांचा जन्म १९५४ साली एका प्रतिष्ठित संगीत घराण्यात झाला. त्यांचे काका म्हणजे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज. भावंडांमध्ये जतिन-ललित ही जोडी नंतर प्रसिद्ध संगीतकार म्हणून ओळखली गेली.
सुलक्षणा यांनी अवघ्या नऊव्या वर्षी गायन कारकीर्द सुरू केली. १९६७ मध्ये त्यांनी पार्श्वगायनात पदार्पण केलं, तर १९७५ मध्ये ‘संकल्प’ चित्रपटातील ‘तू ही सागर है तू ही किनारा’ या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला. त्यांनी किशोर कुमार, हेमंत कुमार यांसारख्या दिग्गजांसोबत गाणी गायली आणि हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती, उडिया अशा विविध भाषांमध्ये आपला आवाज दिला.
१९७० ते १९८० च्या दशकात त्यांनी अभिनय क्षेत्रातही नाव कमावलं. संजीव कुमार यांच्यासोबत ‘उलझन’ आणि ‘संकोच’ तसेच जितेंद्र, राजेश खन्ना, शशी कपूर, विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत अनेक चित्रपटांत काम केलं. बंगाली चित्रपट ‘बंदी’ मधून त्यांनी प्रादेशिक सिनेमातही कामगिरी केली.
आपल्या प्रतिभेने त्यांनी दोन्ही क्षेत्रात ठसा उमटवला, पण नंतर वैयक्तिक आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांना कठीण काळाला सामोरं जावं लागलं. सुलक्षणा पंडित यांनी कधीही लग्न केलं नाही. त्यांच्या निधनानं चाहत्यांसह संगीत आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
