Sukrut Deo: अंबरनाथचा युवा कलाकार सुकृत देव सध्या सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. लोकप्रिय शो India’s Got Latent मधील त्याच्या सहभागानंतर त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या साधेपणाचं आणि व्यक्तिमत्त्वाचंही मोठं कौतुक होत आहे.
सुकृत गेली अनेक वर्षे मराठी रंगभूमीवर कार्यरत आहे. त्याने स्वतः सांगितल्याप्रमाणे, तो गेल्या सात ते आठ वर्षांपासून नाटक क्षेत्रात काम करत आहे. तसेच काही मराठी मालिकांमध्येही त्याने छोट्या भूमिका साकारल्या आहेत.
सुकृतने ‘यदा कदाचित रिटर्न्स’ आणि ‘मुक्काम पोस्ट आडगाव’ यांसारख्या मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. रंगभूमीवरील त्याच्या कामामुळे त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
India’s Got Latent मधील त्याच्या सादरीकरणाने परीक्षक आणि प्रेक्षक दोघांनाही प्रभावित केले. अभिनेत्री आलिया भट्ट हिने त्याचं कौतुक करत “What a star! Give this legend all the love and more” अशी प्रतिक्रिया दिली. तिच्या या शब्दांमुळे सुकृतची चर्चा आणखी वाढली.
सुकृत हा समीर रैना आणि भुवन बामचा मोठा चाहता आहे. शोदरम्यान त्याला एक खास क्षण अनुभवायला मिळाला. समीर रैनाने व्हिडिओ कॉलद्वारे त्याची भुवन बामसोबत थेट बातचीत करून दिली. हा क्षण सुकृतसाठी खूप खास ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी सुकृतने आपल्या पात्रातून बाहेर येत स्वतःचा खरा आवाज प्रेक्षकांसमोर आणला. त्यानंतर उपस्थितांनी त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. अभिनेत्री शरवरीने त्याला मिठी मारल्यानंतर तो भावूक झाला आणि स्टेजवरच त्याच्या डोळ्यात अश्रू आले.
India’s Got Latent चा भाग प्रसारित झाल्यानंतर सुकृतच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. अवघ्या काही तासांत त्याचे सोशल मीडिया फॉलोअर्स 2 हजारांवरून 1 लाखांहून अधिक झाल्याचे सांगितले जात आहे.
यानंतर सुकृतने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्याने शोच्या संपूर्ण टीमचे, आलिया भट्ट, शरवरी, समीर रैना, बलराज घई, आशिष सोलंकी आणि निवड प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांचे आभार मानले.
मराठी रंगभूमी ते राष्ट्रीय स्तरावरील लोकप्रियता असा सुकृतचा प्रवास अनेक तरुण कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याच्या यशामुळे अंबरनाथसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
