Marathi AI Movie: संभाजीनगरच्या सुकन्या सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत अनोखा इतिहास घडवला आहे. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने पहिला मराठी AI चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि आधुनिक तंत्रज्ञान एकत्र आले आहे.
सुकन्या सावंत संभाजीनगर जिल्ह्यातील कुंभेफळ येथील राहणारी आहेत. त्या MCA पदवीधर असून सध्या गृहिणी आहेत. त्यांचा चार-साडेचार वर्षांचा मुलगा आहे. लहान मुलांना मोबाईल किंवा लॅपटॉपवरून शैक्षणिक आणि मनोरंजक गोष्टी दाखवता येऊ शकतात हे त्यांना लक्षात आले. ‘माझ्या मुलीला इतिहास शिकवताना मला कळालं की, या वयात मुलांना चित्रपट आणि शॉर्ट फिल्म्सद्वारे माहिती देणे जास्त प्रभावी ठरते. यासाठी मी हा चित्रपट तयार केला,’ असे सुकन्या म्हणतात.
हा संपूर्ण चित्रपट त्यांनी मोबाईल आणि लॅपटॉपवरच बनवला आहे. या कामात त्यांना कुटुंबीयांचा भरपूर आधार मिळाला. नवरा आणि सासूबाई यांनीही चित्रपट तयार करण्यास मदत केली. ‘चित्रपट तयार करण्यासाठी काही खर्च झाला, पण या चित्रपटाच्या महत्त्वापुढे तो खर्च काहीच नाही,’ असे त्या सांगतात.
लहान प्रेक्षकांसाठी तयार केलेल्या या शॉर्ट फिल्ममध्ये शिवाजी महारजांचा इतिहास समजण्यास सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने सादर केला आहे. यासाठी सुकन्यांनी खूप अभ्यास केला. त्यांनी इतिहासविषयक पुस्तकं वाचली, ऐतिहासिक मुलाखती ऐकल्या आणि मोठ्या इतिहासकारांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्ण केला.
हा चित्रपट लहान मुलांना इतिहासाची माहिती देण्यास सोपा, आकर्षक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणारा माध्यम ठरेल, असे त्यांचे मत आहे. सुकन्या सावंतने माहिती दिली की, हा चित्रपट १२ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे मराठी सिनेसृष्टीला AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवा दृष्टिकोन मिळाला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
