Mahesh Manjrekar: मराठी रंगभूमीवर एक नवीन आणि भावनिक नाटक ‘शंकर-जयकिशन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वडील-मुलीचं नातं आणि त्यातील दडलेली कटुता, तसेच त्यांच्या आयुष्यात अचानक आलेल्या एका परक्या व्यक्तीमुळे बदललेलं समीकरण, अशी या नाटकाची गोष्ट आहे. त्या व्यक्तीचं येणं कशासाठी? त्याच्या आयुष्यात काही रहस्य दडलंय का? याची उत्तरं नाटक पाहिल्यावरच मिळणार आहेत.
या नाटकाचं आणखी एक आकर्षण म्हणजे पहिल्यांदाच भरत जाधव आणि महेश मांजरेकर रंगभूमीवर एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे महेश मांजरेकर तब्बल 29 वर्षांनंतर रंगमंचावर पुनरागमन करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या नाटकाबद्दल मोठी उत्सुकता आहे.
दिग्दर्शक सुरज पारसनीस सांगतात, “हे नाटक फक्त हसवणारं नाही. नात्यांमधल्या अदृश्य धाग्यांना भिडणारं आहे. पित्याच्या आणि मैत्रीच्या नात्याचा वेगळा पैलू यातून उलगडेल.”
भरत जाधव म्हणतात, “महेशजींसोबत काम करणं नेहमीच खास अनुभव असतो. आमची केमिस्ट्री रंगमंचावर वेगळी जादू निर्माण करेल याची मला खात्री आहे.”
महेश मांजरेकरही आपल्या कमबॅकबाबत भावनिक आहेत. “रंगभूमी माझ्यासाठी नेहमीच अग्रस्थानी आहे. चित्रपटांमुळे वेळ मिळत नव्हता, पण आता शक्य तितका वेळ मी नाटकासाठी देणार आहे,” असं ते म्हणाले.
‘शंकर-जयकिशन’ नाटकाचं लेखन विराजस कुलकर्णी यांनी केलं आहे. निर्मिती भरत जाधव एण्टरटेन्मेंटची असून दिग्दर्शन सुरज पारसनीस यांचे आहे. शिवानी रांगोळे, भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नाटकाचा शुभारंभ 19 डिसेंबर रोजी विलेपार्लेतील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
