Krantijyoti Vidyalaya Movie Teaser: मराठी शाळांची घटती संख्या आणि मातृभाषेतील शिक्षणावरील कमी होत जाणारी आवड या पार्श्वभूमीवर हेमंत ढोमे यांचा नवा चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ काही दिवसांपूर्वी जाहीर झाला होता. आता या चित्रपटाचा हलकाफुलका पण भावूक करणारा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
ढोमे नेहमी घरातल्या, जवळच्या गोष्टींवर चित्रपट बनवतात. त्यामुळे शाळा, वर्गमैत्री आणि त्या काळातील आठवणी या सगळ्याशी जोडलेले भाव इथे पुन्हा उभे राहतील, हे टीझरमधून स्पष्ट होते. प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच मराठी शाळेच्या महत्त्वाची आठवण करून देणारी ही कथा असेल, अशी चाहत्यांची प्रतिक्रिया आहे.
टीझरमध्ये दिसतंय की मराठी शाळा बंद होण्याच्या संकटात आहे. अनेक वर्षांनी जुने विद्यार्थी पुन्हा भेटतात आणि शाळेत येतात. या भेटीतून जुने क्षण, मैत्री, नातं आणि त्या जागेबद्दलचं प्रेम पुन्हा उलगडतं. या प्रवासातून प्रेक्षकांना स्वतःच्या शाळेची आठवण होईल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे मराठी चित्रपटात पहिल्यांदाच प्राजक्ता कोळी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “शाळा आपल्या आयुष्याचा पाया असतो. पहिली भीती, पहिली मैत्री, पहिलं प्रेम—हे सगळं तिथंच घडतं. त्यामुळे हा चित्रपट करताना प्रेक्षकांना त्यांच्या शाळेच्या आठवणी ताज्या होतील, याची काळजी घेतली आहे.” त्यांनी मराठी शाळांचे महत्त्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं, यासाठी कथा बांधल्याचंही सांगितलं.
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा निर्मितीत क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळींसोबत विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ सहभागी आहेत. याच टीमने ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
