KJVMM Box Office Collection: मराठी भाषेचा अभिमान आणि मराठी शाळांच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष दाखवणारा ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ (KJVMM) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. हा सिनेमा २०२६ मधील पहिला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला आहे.
या चित्रपटाने अवघ्या १५ दिवसांत जवळपास १५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हेमंत ढोमे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे १४ कोटी ९० लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. कमी बजेट असूनही या सिनेमाने मोठी व्यावसायिक कामगिरी केली आहे.
विशेष म्हणजे दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत सुमारे ३५ टक्क्यांची वाढ झाली. मराठी चित्रपटांसाठी हे क्वचितच पाहायला मिळते. मकर संक्रांतीच्या सुट्टीतही सिनेमाने आपली पकड कायम ठेवली होती.
प्रेक्षकांच्या वर्ड ऑफ माउथ मुळे मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे अनेक शो हाऊसफुल्ल होत आहेत. शाळेच्या आठवणी, पहिलं प्रेम आणि जुन्या मित्रमैत्रिणींचे किस्से या कथेतून प्रेक्षकांना भावनिक जोड मिळत आहे.
चित्रपटात मराठी माध्यमाच्या शाळेला वाचवण्यासाठी माजी विद्यार्थी एकत्र येतात आणि संघर्ष करतात, ही कथा प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. सचिन खेडेकर यांचा दमदार अभिनय, अमेय वाघची विनोदी भूमिका आणि प्राजक्ता कोळीचं मराठी सिनेसृष्टीतील पदार्पण प्रेक्षकांना भावलं आहे.
या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी, अमेय वाघ, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमित अशा कलाकारांच्या भूमिका आहेत.
याच काळात मोठ्या बजेटचे बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही KJVMM ने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे. नफ्याच्या बाबतीत हा सिनेमा इतर चित्रपटांपेक्षा पुढे आहे. आता हा सिनेमा २० कोटींचा टप्पा पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
