श्री. ना. पेंडसे यांच्या गाजलेल्या साहित्यकृतीवर आधारित हा चित्रपट गुरुप्रसाद फिल्म्स आणि विषय प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी ही कथा नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आणली आहे.
‘गारंबीचा बापू’ची कथा गारंबी गावाभोवती फिरते. कोकणात खोताची सत्ता आणि त्याचा प्रभाव मोठा असल्याचं या कथेत पाहायला मिळतं. गारंबीतील अण्णा खोत हा आपल्या सत्तेच्या जोरावर गावावर दबदबा निर्माण करणारा व्यक्ती आहे.
मात्र त्याच्या या दहशतीला घाबरून न जाता त्याला आव्हान देणारा तरुण म्हणजे बापू. कुणाचीही भीड न बाळगता स्वतःच्या मनाप्रमाणे जगणारा बापू आपल्या बेफाम आणि बंडखोर स्वभावामुळे गारंबीत ‘अफाट बापू’ म्हणून ओळखला जातो.
या बापूच्या आयुष्यात राधाची एन्ट्री होते. राधा ही व्यक्तिरेखा श्री. ना. पेंडसे यांच्या लेखणीतून साकारलेली महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. एका बाजूला बापूचा बंडखोर स्वभाव, दुसरीकडे अण्णा खोतची दहशत आणि त्यामध्ये दबलेलं गारंबी गाव, अशा वातावरणात ही कथा पुढे सरकते.
या चित्रपटात प्रसाद ओक बापूच्या भूमिकेत दिसणार आहेत. बापूच्या कलंदर आणि बेफाम स्वभावाला ते आपल्या अभिनयातून कसं साकारतात, याची उत्सुकता आहे. देविका दफ्तरदार राधाची भूमिका साकारणार आहेत.
यतिन कार्येकर अण्णा खोतच्या भूमिकेत दिसणार असून, त्याच्या सत्तेचा आणि क्रूर स्वभावाचा पैलू ते पडद्यावर उभा करणार आहेत. जयवंत वाडकर मुसाच्या भूमिकेत, शशी पेंडसे विठोबाच्या भूमिकेत, तर माधवी सोमण मावशीच्या भूमिकेत दिसतील.
चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी जयसिंग यांनी सांभाळली आहे. त्यामुळे कोकणचं निसर्गसौंदर्य आणि रांगडेपण दोन्ही मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी वैशाली सामंत यांनी सांभाळली आहे. अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, उर्मिला धनगर आणि वैशाली सामंत यांच्या आवाजातून कोकणच्या लोकधुनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत.
सत्तेच्या विरोधात उभा राहणाऱ्या एका बंडखोर तरुणाची कथा आणि मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू या चित्रपटातून मांडले जाणार आहेत. त्यामुळे ‘गारंबीचा बापू’ची गाजलेली कथा नव्या तंत्रज्ञानासह मोठ्या पडद्यावर कशी साकारली जाते, याकडे मराठी चित्रपटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
