मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि अष्टपैलू अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दशावतार’ चित्रपटात त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी स्वतः धडधडीत ॲक्शन सीन केले आहेत. नदीत पोहणे, अरण्यात धावपळ, अगदी अंडरवॉटर शॉट्सही त्यांनी बॉडी डबलशिवाय स्वतः केले.
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी त्यांच्या वयाचा विचार करून बॉडी डबल ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रभावळकरांनी ठामपणे सांगितलं – “ॲक्शन नैसर्गिक दिसायला हवं, त्यामुळे मीच करतो.” आणि त्यांनी ते करून दाखवलं.
चित्रपटाचं चित्रीकरण कोकणातील दाट जंगलं, तलाव आणि दुर्गम ठिकाणी झालं. चिकनगुनियासारखा आजार झाल्यानंतरही त्यांनी सर्व सीन ताकदीने पूर्ण केले. विविध वेशभूषा, आव्हानात्मक लोकेशन्स आणि थकवणाऱ्या परिस्थितीवर मात करत त्यांनी भूमिकेला न्याय दिला.
या चित्रपटात त्यांनी तब्बल ११ वेगवेगळ्या पात्रांना साकारलं आहे. त्यातील ‘बाबुली’ ही व्यक्तिरेखा विशेष लक्षवेधी ठरली. अनुभव सांगताना ते म्हणाले, “ही भूमिका माझ्यासाठी एक वेगळं आव्हान होतं. ॲक्शन करताना थोडी भीती होती, पण या वयात असा अनुभव घेणं रोमांचक वाटलं. ‘दशावतार’ हा माझ्यासाठी अविस्मरणीय प्रवास ठरला.”
या चित्रपटात महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. संवाद आणि गीतलेखन गुरु ठाकूर यांचं असून, संगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिलं आहे.
‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत आणि सुबोध खानोलकर दिग्दर्शित हा चित्रपट सध्या सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
