Deepjyoti Serial : सध्या मराठी टीव्हीवर नव्या मालिकांची रेलचेल सुरू आहे. Zee Marathi ने आणखी एक नवी मालिका जाहीर केली आहे. ‘दीपज्योती’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिची रिलीज डेट आणि कास्टही समोर आली आहे.
ही मालिका 13 एप्रिलपासून दररोज रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे. तीन बहिणी आणि त्यांच्या भावाभोवती फिरणारी ही कथा असल्याचं प्रोमोमधून दिसतं. प्रोमो रिलीज होताच प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे.
प्रोमोमध्ये एक साधं, आनंदी कुटुंब दाखवलं आहे. आई, तीन बहिणी आणि त्यांचा एकुलता एक भाऊ. भाऊ रिक्षा चालवून घर चालवतो. ज्योती ही बहिण कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसते. दरम्यान, एका बहिणीचं लग्न सुजयसोबत ठरतं.
दुसरीकडे दीप हा श्रीमंत घरातील मुलगा आहे. आईच्या मृत्यूनंतर तो खचलेला असून दारूच्या आहारी गेलेला दाखवला आहे. कथेत मोठा ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा दीपच्या गाडीचा रिक्षाला अपघात होतो. या अपघातात ज्योतीचा भाऊ आणि सुजयचा मृत्यू होतो.
या घटनेनंतर कथा वेगळं वळण घेते. एकीकडे ज्योतीची बहीण सूड घेण्याचा निर्णय घेते, तर ज्योती मात्र प्रेमाने आणि संयमाने घर सावरण्याचं वचन देते. त्यामुळे मालिकेत भावनिक ड्रामा आणि संघर्ष दोन्ही पाहायला मिळणार आहेत.
या मालिकेत पूर्वा कौशिक, ओंकार गोवर्धन, प्रसाद जवादे, डॉ. गिरीश ओक, अक्षय विंचुरकर, सलोनी सुर्वे आणि मानसी सुभाष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आणखी कोणते कलाकार असणार, याची उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये आहे.
दरम्यान, ‘दीपज्योती’ रात्री 8 वाजता येणार असल्यामुळे सध्या त्या वेळेत सुरू असलेल्या ‘लक्ष्मीनिवास’ मालिकेचं काय होणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मालिका बंद होणार की तिची वेळ बदलणार, याबाबत अजून स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
