दिवंगत अभिनेता सचिन चांदवडेला वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली; ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रतिसाद

Asurvan Trailer: मराठी चित्रपटसृष्टीत अलीकडे अनेक दमदार कथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आता ‘असुरवन’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. दिग्दर्शक सचिन आंबात यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा अभिनेता हार्दिक जोशी यांच्या हस्ते मुंबईत झाला. टीममधील सर्व कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘असुरवन’ हा चित्रपट ५ डिसेंबरला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

मोशन पोस्टर आणि टीझर आल्यानंतर चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली होती. पण काही दिवसांनी आलेल्या एका बातमीनं सगळ्यांनाच धक्का बसला—चित्रपटातील मुख्य अभिनेता सचिन चांदवडे याने आत्महत्या केली होती. टीमवर ही बातमी कोसळली, पण त्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय कायम ठेवला. ट्रेलर बाहेर आल्यानंतर प्रेक्षकांनी “मराठीत काहीतरी वेगळं आणि भारी येतंय” अशा प्रतिक्रिया दिल्या.

चित्रपटात कोकणातील मातीचा गंध, आदिवासी पाड्यातील वारली परंपरा, रूढी आणि प्रथा यांचा सुंदर मिलाफ दिसतो. शापित जंगल, गूढ घटना आणि थरार निर्माण करणारा सूर्याच्या मुखवट्याचा चेहरा—या सर्वांवर आधारित ही कथा आहे. ट्रेलरमधील “खबर कलली का” हा आगरी भाषेतील संवादही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. थ्रिलर, गूढ आणि ड्रामाचं मिश्रण असलेला हा चित्रपट वेगळ्या अनुभवाचं वचन देतो.

सचिन आंबात यांनी सांगितलं, की प्रेक्षकांकडून वाढलेल्या अपेक्षांचा विचार करतच ट्रेलर तयार करण्यात आला. “मराठीत शापित जंगलावर आधारीत असा सस्पेन्स थ्रिलर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर आणतो आहोत. प्रेक्षकांना नक्कीच नवा अनुभव मिळेल,” असं ते म्हणाले.

या प्रवासात सर्वात जास्त जाणवणारी पोकळी म्हणजे सचिन चांदवडे नसणं. जॉबसोबत मेहनत करत त्याने अभिनयात आपलं स्थान शोधण्याचा प्रयत्न केला. टीममधला तो सर्वात लहान पण उत्साही सदस्य होता. पोस्टर रिलीज झाल्यावर त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आत्महत्येच्या आदल्या दिवशीच त्याची दिग्दर्शकांशी शेवटची चर्चा झाली होती. त्याचं अचानक जाणं टीमसाठी आणि प्रेक्षकांसाठीही मोठं दुःख ठरलं.

असुरवन प्रेक्षकांच्या भेटीला येताना त्याची आठवण नक्कीच कायम जाणवत राहणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page