बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या मराठी मेकअप आर्टिस्ट अशोक सावंत यांचं निधन झालं असून, २७ वर्षांची त्यांची साथ आता संपली आहे.
अभिषेकने लिहिलं, “अशोक दादा आणि मी २७ वर्षांहून अधिक काळ एकत्र काम केलं. माझ्या पहिल्या चित्रपटापासून ते माझा मेकअप करत होते. ते केवळ माझ्या टीमचाच भाग नव्हते, तर माझ्या कुटुंबाचाही भाग होते.”
अभिषेकने पुढे सांगितलं की, “अशोक दादांचा मोठा भाऊ दीपक सावंत हे जवळपास ५० वर्षांपासून माझ्या वडिलांचा मेकअप आर्टिस्ट आहेत. काही वर्षांपासून अशोक दादा आजारी होते, त्यामुळे त्यांना सेटवर येता येत नव्हतं. पण ते नेहमी माझी चौकशी करायचे. त्यांनी पाठवलेला सहाय्यक माझा मेकअप नीट करत आहे ना, याची ते सतत काळजी घ्यायचे.”
त्यांच्या आठवणी सांगताना अभिषेक म्हणाला, “त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असायचं. त्यांची उबदार मिठी आणि त्यांच्या बॅगेत असणारा चटपटीत चिवडा अजूनही आठवतो.”
तो पुढे म्हणतो, “मी जेव्हा जेव्हा नवीन चित्रपटाचा पहिला शॉट द्यायचो, तेव्हा त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचो. आता यापुढे मला स्वर्गाकडे पाहावं लागेल आणि तुम्ही तिथून मला आशीर्वाद द्याल अशी आशा आहे.”
“धन्यवाद दादा, तुमच्या प्रेमासाठी, काळजीसाठी आणि हसऱ्या चेहऱ्यासाठी,” असं म्हणत अभिषेकने आपल्या पोस्टचा शेवट केला.
अभिषेक बच्चनच्या या पोस्टखाली रणवीर सिंह, वरुण धवन, रेमो डिसूझा, करण जोहर, रितेश देशमुख, रवीना टंडन, बोमन इराणी आणि नव्या नंदा यांनी अशोक सावंत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
