तांडेल: १२ वर्षांचं स्वप्न, सयाजी शिंदे आणि ओम भुतकरसोबत नवा मराठी चित्रपट २०२७ मध्ये!

Tandel Movie: बारा वर्षांचं सिनेमाचं स्वप्न आता प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. ‘तांडेल’ नावाचा नवा मराठी चित्रपट २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे आणि आपल्या कसदार अभिनयाने मने जिंकणारे ओम भुतकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

अथांग स्टुडिओजने या पहिल्याच चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. वेगळ्या आणि आशयपूर्ण कथा प्रेक्षकांपर्यत पोहोचवणं हा या नव्या निर्मिती संस्थेचा हेतू आहे.

चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संदीप पांडुरंग माने यांचे आहे. तर पटकथा आणि संवादलेखनाची जबाबदारी किरण यज्ञोपवित यांनी सांभाळली आहे. एका पारंपरिक मच्छिमाराची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.

समुद्राशी माणसाचं असलेलं अतूट नातं, त्याचं जगणं आणि बदलत्या काळातील संघर्ष अशा गोष्टी तांडेल चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

दिग्दर्शक संदीप पांडुरंग माने म्हणाले, “‘तांडेल’ ही आमची पहिली कलाकृती म्हणजे केवळ पारंपरिक मासेमारीची कथा नाही, तर आधुनिकीकरणाच्या वेगात आपलं अस्तित्व जपून पाहणाऱ्या माणसांच्या जगण्याची ही गोष्ट आहे.”

त्यांनी पुढे सांगितलं, “गेली बारा वर्षे आम्ही जपलेलं सिनेमाचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या प्रवासातला ‘तांडेल’ हा महत्त्वाचा टप्पा आहे. सयाजी शिंदे आणि ओम भुतकर यांच्यासारखे ताकदीचे कलाकार या कथेला एक वेगळीच उंची देतील.”

नुकताच चित्रपटाचा थरारक टायटल टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यातून चित्रपटाचं कथाविश्व प्रेक्षकांसमोर आलं आहे.

निर्मात्या अमृता संदीप माने यांनी अथांग स्टुडिओजच्या माध्यमातून एका आशयघन आणि भव्य विषयाची निवड केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार कलाकृती सादर करण्याचा त्यांचा मानस आहे.

प्रकल्पाच्या निर्मिती प्रक्रिया आणि नियोजनाची जबाबदारी कार्यकारी निर्माता दत्तसंग्राम वासमकर यांनी सांभाळली आहे. तर समुद्राची अथांगता आणि त्यातील संघर्षाचा थरार छायाचित्रकार अभिमन्यु डांगे यांनी कॅमेऱ्यात टिपला आहे.

अजून एक गोष्ट लक्षवेधी आहे. सयाजी शिंदे आणि ओम भुतकर यांचे लुक आणि इतर कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे चित्रपटात नेमके कोण दिसणार आणि त्यांच्या भूमिका कशा असणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

२०२७ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या टायटल टीझरने आतापासूनच सिनेरसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page