भरत जाधव पुन्हा रंगभूमीवर; डिसेंबरमध्ये पुणे-मुंबईत रंगणार ‘गेला बापट कुणीकडे?’; पहिला प्रयोग ५ तारखेला

Gela Bapat Kunikade Natak: आजकाल प्रसारमाध्यमांपासून सोशल मीडियापर्यंत ‘बापट’ हे नाव वेगळ्या-वेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. डीजचा दणदणाट असो, ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा असो, किंवा त्यावरून व्हायरल होणारे मीम्स असो – सगळीकडे ‘बापट’ चांगलाच गाजतोय. आणि आता रंगभूमीवरही एका बापटाची भर पडणार आहे.

पण थांबा! या बापटांचा सध्याच्या बातम्यांशी, कोणत्याही वादाशी किंवा चर्चेतल्या व्यक्तींशी काहीही संबंध नाही. कारण हा आहे राम बापट – एक साधा, सरळ माणूस. त्याच्याच आयुष्यात घडणाऱ्या भन्नाट गोंधळाची गोष्ट सांगणारं नवं विनोदी नाटक म्हणजे ‘गेला बापट कुणीकडे?‘

या नाटकामुळे भरत जाधव पुन्हा रंगभूमीवर परतत आहेत. नाटकाची पत्रकार परिषदही नुकतीच संपली आहे.

राम बापटांच्या आयुष्यात नेमकं असं काय घडतं, की सगळ्यांनाच प्रश्न पडतो – गेला बापट कुणीकडे? या शोधातून रंगणारा गोंधळ, घडणारे विनोदी प्रसंग आणि त्यातून निर्माण होणारी धमाल प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. हास्य, गोंधळ आणि नात्यांची भन्नाट गुंतागुंत उलगडणारं हे धमाल नाटक आहे.

‘भरत जाधव एंटरटेनमेंट्स’ प्रस्तुत आणि ‘ब्रह्मांडनायक पिक्चर्स’ निर्मित हे नाटक आहे. लेखन आणि दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचं आहे. निर्मिती हार्दिक मोगावीरा यांची, तर सहनिर्मिती राम राणे यांची आहे.

नाटकात मिलिंद फाटक आणि पूर्णिमा तळवळकर यांच्यासह शार्दूल सराफ, गौरी सुखटणकर, पालवी कदम, चिंतन लांबे, राम राणे आणि विजय मिरगे हे कलाकार आपल्या दमदार अभिनयातून गोष्टीला रंगत आणणार आहेत.

अभिनेते आणि नाटकाचे प्रस्तुतकर्ते भरत जाधव म्हणाले, “चांगली कलाकृती केवळ निर्माण होऊन चालत नाही, तर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तिला मोठं करण्याची जबाबदारीही आपली असते. दर्जेदार कलाकृतीला योग्य पाठबळ मिळालं, तर ती अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचू शकते. या नाटकाचे मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रयोग व्हावेत, प्रत्येक शहरात आणि गावात ते रसिकांपर्यंत पोहोचावं, ही माझी मनापासून इच्छा आहे.”

लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी सांगितलं, “नाटकाची कथा मला कोरोना काळात सुचली. मात्र नाव सध्या चर्चेत असलेल्या ‘बापट’ प्रकरणावरून सुचलं. नावातल्या या मिश्कीलपणामुळे नाटकाबद्दल उत्सुकता निर्माण होते; पण कथा पूर्णपणे वेगळी आणि रंजक आहे. भरत जाधव यांची साथ, निर्मात्यांचा विश्वास आणि संपूर्ण टीमच्या पाठबळामुळे हे नाटक साकार झालं.”

मिलिंद फाटक म्हणाले, “‘गेला बापट कुणीकडे’ हे नावच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारं आहे. भरत जाधव आणि राजेश देशपांडे यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम करण्याचा आनंद वेगळाच आहे. भरत जाधव हे नाव जिथे असतं, तिथे हाऊसफुल्लचा बोर्ड लागण्याची परंपराच आहे. त्यामुळे हे नाटकही हाऊसफुल्ल होईल, असा मला ठाम विश्वास आहे.”

पूर्णिमा तळवळकर म्हणाल्या, “मी पहिल्यांदाच विनोदी नाटकात काम करत आहे आणि खूप काही शिकायला मिळत आहे. राजेशचं लेखन इतकं सशक्त आहे की त्यातून विनोद आपसूकच निर्माण होतो. असं दर्जेदार लेखन असलेल्या नाटकाचा भाग होता येणं, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.”

नाटकामागची टीमही भक्कम आहे. संगीत दिग्दर्शन तुषार देवल यांचं, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची, वेशभूषा महेश शेरला यांची आणि रंगभूषा उदय तांगडी यांची आहे. गोट्या सावंत सूत्रधार आहेत, नेपथ्य संदेश बेंद्रे यांचं आणि व्यवस्थापन अनुदीप जाधव यांचं आहे.

आता येते सर्वात महत्त्वाची बाब – नाटकाचे प्रयोग डिसेंबरमध्ये पुणे आणि मुंबईत रंगणार आहेत. पहिला प्रयोग ५ डिसेंबर रोजी शनिवारी दुपारी १२:३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होईल. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी रविवारी सायंकाळी ५ वाजता विठ्ठलराव तुपे नाट्यगृह, हडपसर येथे प्रयोग आहे.

मुंबईत १३ डिसेंबर रोजी रविवारी रात्री ८:३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिर, मुलुंड येथे, तर १५ डिसेंबर रोजी मंगळवारी दुपारी ४ वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे नाटकाचे प्रयोग रंगणार आहेत.

हसायचं आहे आणि मन हलकं करायचं असेल, तर हा बापट नक्कीच भेटायला हवा. सध्याच्या चर्चेतल्या बापटांपेक्षा रंगभूमीवरचा हा बापट नक्कीच वेगळा ठरणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page