या चित्रपटात अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ बोडकेही महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.
चित्रपटाची कथा माणसांमधील नातेसंबंधांभोवती फिरते. दोन आयुष्यांना अनपेक्षितपणे जोडणाऱ्या एका अनोख्या बंधाची ही हृदयस्पर्शी गोष्ट आहे. हा बंध दोघांचे आयुष्य त्यांच्या कल्पनेपलीकडे जाऊन कसे बदलतो, हे पडद्यावर पाहायला मिळेल. तू आहेस ना चित्रपट 2027 मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
‘देवमाणूस’ या यशस्वी चित्रपटानंतर लव फिल्म्सने हा दुसरा मराठी चित्रपट सादर करत आहे. सुप्रिया पिळगावकर यांचा हा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरील प्रवास आहे. मराठी, हिंदी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि रंगभूमीमध्ये अनेक दशकांपासून आपली छाप सोडणाऱ्या या अभिनेत्रीला या चित्रपटाची भावनिक कथा विशेष भावली आणि त्यामुळेच त्यांनी या प्रकल्पाचा भाग होण्याचे ठरवले.
चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिपक गावडे यांनी केले आहे. त्यांच्याआधीच्या कामाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये गौरवण्यात आले आहे.
चित्रपटाबद्दल सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या, “आजच्या काळातील या चित्रपटाचा विषय आणि त्याचे महत्त्व मला अभिनेत्री म्हणून विशेष भावले. या विषयाची मांडणी आणि मी साकारत असलेली व्यक्तिरेखा यामुळेच मी या चित्रपटाशी जोडले जाण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांनी हा चित्रपट इफ्फीमध्ये पाहावा, याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”
सिद्धार्थ बोडके म्हणाले, “या चित्रपटाने मला भावनांचे विविध पैलू असलेली व्यक्तिरेखा साकारण्याचे आव्हान दिले. अभिनेता म्हणून अशी भूमिका करण्याची नेहमीच इच्छा होती. ‘देवमाणूस’नंतर लव फिल्म्ससोबत हा माझा दुसरा प्रकल्प आहे.”
दिग्दर्शक दिपक गावडे यांनी सांगितले, “मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा दिग्दर्शन करण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक ठरला. ‘तू आहेस ना’ ही कथा माझ्या मनाच्या खूप जवळची आहे. या चित्रपटाला प्रतिष्ठित इफ्फीमध्ये जागतिक प्रीमियर मिळत असल्याचा मला विशेष आनंद आहे.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
