दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनात येणाऱ्या दर्याभवानी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. हा चित्रपट श्री शिवराज अष्टक या आठ चित्रपटांच्या मालिकेतील सातवा चित्रपट आहे.
चित्रीकरणासाठी कोकणातील ऐतिहासिक पूर्णगड किल्ला निवडण्यात आला आहे. रत्नागिरीजवळ निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेल्या या किल्ल्यावर सध्या चित्रपटाचे काम सुरू आहे.
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदृष्टी सागरी धोरण आणि मराठी आरमाराचा पराक्रम पाहायला मिळणार आहे. समुद्र, किल्ला आणि इतिहास यांचा अनोखा संगम ‘दर्याभवानी’मध्ये मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल.
चित्रीकरणाला सुरुवात झाली ती अथांग समुद्राच्या साक्षीने. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिजीत श्वेतचंद्र यांनी समुद्राला श्रीफळ अर्पण करून चित्रपटाचे काम सुरू केले.
याच प्रसंगी माध्यम प्रतिनिधींसाठी रत्नागिरीत एक अनोखा मीडिया संवादही आयोजित करण्यात आला होता. चित्रपटाचा विषय ऐतिहासिक असल्याने त्याची साक्ष इतिहासाने व्हावी, या विचारातून ही संकल्पना पुढे आली आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्येक कार्य, प्रत्येक मोहीम आणि त्यामागील विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत. याच उद्देशाने आम्ही सर्वांनी मिळून श्री शिवराज अष्टकाचा संकल्प केला.”
आठ चित्रपटांच्या या मालिकेत ‘दर्याभवानी’ हा सातवा चित्रपट आहे. अष्टक पूर्ण होण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
चित्रपटात नामवंत कलाकारांची मांदियाळी आहे. आऊसाहेबांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र आणि तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अजय पुरकर दिसणार आहेत.
याशिवाय योगिनीच्या भूमिकेत स्मिता शेवाळे, नंदाच्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे, बाजी सर्जेराव यांच्या भूमिकेत आस्ताद काळे, किसनाच्या भूमिकेत निखिल राऊत आणि खेमनाकच्या भूमिकेत विराजस कुलकर्णी आहेत.
हिरोजी इंदुलकर यांच्या भूमिकेत सचिन देशपांडे, मायनाक भंडारी यांच्या भूमिकेत ऋषी सक्सेना आणि दर्यासारंग यांच्या भूमिकेत इंद्रनील कामत हेही या चित्रपटात आहेत.
‘दर्याभवानी’ हा केवळ ऐतिहासिक चित्रपट नसून मराठी इतिहासातील एका महत्त्वाच्या पर्वाला मोठ्या पडद्यावर आणणारा प्रकल्प आहे. शिवरायांचे सागरी स्वप्न आणि मराठी आरमाराचा अभिमान या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
