‘सोहळा’ हा केवळ एका उत्सवाची गोष्ट नाही, तर बालपणातून मोठं होत जाणाऱ्या एका मुलाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याची कथा आहे. कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत साजरा होणाऱ्या या सोहळ्यात मुलगा पहिल्यांदा वडिलांच्या चपला घालतो. बालपणाच्या उंबरठ्यावरून पुरुषत्वाकडे टाकलेलं हे प्रतीकात्मक पाऊल त्याच्यासाठी खास असतं.
चित्रपटाच्या पोस्टरमधून ‘पश्या’ या 13 वर्षीय मुलाची ओळख प्रेक्षकांना करून देण्यात आली आहे. नवीन कपडे, आशीर्वाद, मिठाई, कुटुंबासोबतचा आनंद आणि गावातील मंदिरात जाणं अशा अनेक गोष्टींमुळे त्याच्यासाठी हा दिवस मोठ्या उत्सवासारखा असतो.
मात्र, हा आनंदाचा क्षण येण्याआधीच त्याच्या आयुष्याला वेगळं वळण मिळतं. त्यानंतर पश्या कोणता निर्णय घेतो आणि त्याच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो, याभोवती ‘सोहळा’ची कथा पुढे जाते.
‘सोहळा’शी जोडले जाण्याबद्दल सोनाली बेंद्रे म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षांत अनेक चित्रपटांसाठी आपलं नाव जोडण्याची विनंती त्यांना करण्यात आली. मात्र, त्यांनी फार कमी वेळा त्याला होकार दिला. ‘सोहळा’ हा त्या मोजक्या होकारांपैकी एक असल्याचं त्यांनी सांगितलं.
“सोहळा हा असा चित्रपट नाही जो पाहून आपण विसरून जातो. एखादं पुस्तक शांतपणे आपल्यात बदल घडवून आणतं आणि बराच काळ आपल्यासोबत राहतं, तसा हा चित्रपट माझ्यासोबत राहिला,” असं सोनाली बेंद्रे यांनी सांगितलं.
दिग्दर्शक सैकत बागबान यांच्या मते, ‘सोहळा’ हा बालपण, मैत्री, कुटुंब आणि व्यक्तिमत्त्वाचा भाग बनणाऱ्या छोट्या-छोट्या क्षणांचा उत्सव आहे. या कथेच्या केंद्रस्थानी पश्या आहे आणि पोस्टरच्या माध्यमातून त्याची प्रेक्षकांशी पहिली भेट होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
या चित्रपटाची निर्मिती Rose Audio Visualsच्या बॅनरखाली गोल्डी बहल यांनी, तर Carryon Filmsच्या बॅनरखाली सचिन श्रीवास्तव, रत्ना श्रीवास्तव आणि कविता बागबान यांनी केली आहे. चित्रपटात प्रविण दळिंबकर, देवदत्त प्रशांत गोणे, वर्षा मालवडकर, वैष्णवी संजय घोडके आणि Alessandra Whelan Merediz यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Cinepolisकडून ‘सोहळा’चं संपूर्ण भारतातील थिएटर वितरण करण्यात येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर 29 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असून, 16 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
