मुंबईकरांसाठी गणेशोत्सवाची खास भेट; 17 सप्टेंबरपासून शास्त्रीय संगीत महोत्सव

Classical Music Festival in Mumbai, Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर यंदा प्रथमच मुंबईत शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 ते 24 सप्टेंबर 2026 दरम्यान हा महोत्सव प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘गणेशोत्सव 2026 शास्त्रीय संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी 6.30 वाजता संगीताच्या मैफली रंगणार आहेत.

या आठ दिवसांच्या महोत्सवात विविध नामवंत कलाकार गायन आणि वादन सादर करणार आहेत. अभिजात शास्त्रीय संगीताची परंपरा जपणे आणि ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

17 सप्टेंबरला महोत्सवाची सुरुवात होईल. यावेळी सुभद्रा देसाई यांचे गायन होणार असून एस. आकाश आणि मेहताब अली नियाझी यांचे बासरी-सतार युगल वादन होईल.

18 सप्टेंबरला स्वर शर्मा आणि अनुजा झोकरकर यांचे गायन होणार आहे. 19 सप्टेंबरला नूपुर गाडगीळ आणि नागेश आडगावकर यांच्या गायनाची मैफल रंगेल.

20 सप्टेंबरला मृणालिनी देसाई रुद्रवीणेचे सादरीकरण करतील. त्यानंतर गंधार देशपांडे गायन सादर करतील. 21 सप्टेंबरला यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन वादन आणि प्राजक्ता मराठे यांचे गायन होणार आहे.

22 सप्टेंबरला धनंजय हेगडे यांच्या गायनासोबत यशवंत वैष्णव आणि सुखद मुंडे यांचे तबला-पखावज युगल वादन होईल. 23 सप्टेंबरला विनय रामदासन गायन, तर अभिषेक बोरकर सरोद वादन सादर करतील.

24 सप्टेंबरला महोत्सवाची सांगता होईल. समारोपाच्या दिवशी केदार केळकर यांचे गायन तसेच अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांचे युगल गायन होणार आहे.

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये पूर्वी शास्त्रीय संगीताच्या मैफली, नाट्यसंगीत, भावसंगीत आणि व्याख्यानमाला असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. 1960 ते 1980 या काळात गणेशोत्सवाच्या निमित्ताने नामवंत कलाकारांचे कार्यक्रम सर्वसामान्य रसिकांना ऐकता येत होते.

नंतरच्या काळात चित्रपटसंगीत, ऑर्केस्ट्रा आणि डीजेचा प्रभाव वाढला. त्यामुळे गणेशोत्सवातील शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचे प्रमाण कमी झाले. आता राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर या जुन्या संगीत परंपरेला उजाळा देण्याचा प्रयत्न या महोत्सवातून करण्यात येत आहे.

या महोत्सवाचे सूत्रसंचालन राणी वर्मा करणार आहेत. नियोजन आणि संकलनाची जबाबदारी पंचम निषादचे संचालक आणि संस्थापक शशी व्यास यांनी सांभाळली आहे.

हा महोत्सव सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

संगीतप्रेमींसाठी या महोत्सवाला प्रवेश निःशुल्क आहे. मुंबई आणि परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संगीत महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page