अभिनेता सुमित राघवन यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारावर नाराजी व्यक्त केली. प्रश्न विचारणं हा लोकशाहीचा भाग असल्याचं सांगत त्यांनी विविध सार्वजनिक प्रश्नांकडे लक्ष वेधलं. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
सुमित राघवन यांनी आपल्या प्रतिक्रियेत, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली, असा सवाल उपस्थित केला. देशाच्या भविष्यासाठी विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकणं अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संवाद आणि शांततेवर विश्वास असल्याचं सांगितलं. कोणताही वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवता येतो, असं मत व्यक्त करत प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेदनेबद्दल तिला दुःख होत असल्याचं तिने लिहिलं.
दरम्यान, अभिनेत्री वनिता खरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाली होती. तिने संविधानाची प्रत हातात घेत आंदोलनात सहभाग नोंदवला. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अन्यायाविरोधात आवाज उठवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं तिने म्हटलं.
वनिता खरातने आपल्या पोस्टमध्ये, प्रश्न विचारणं हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचं नमूद केलं. विद्यार्थ्यांचा आवाज दाबून भविष्य घडत नाही, तर त्यांचा आवाज ऐकून राष्ट्र घडतं, असं म्हणत तिने न्यायासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
