Mi Sansar Majha Rekhite Serial: मराठी वाहिन्यांवर सुरू असलेल्या काही मालिकांमुळे प्रेक्षक अक्षरशः वैतागले आहेत. कथानक, प्रसंग आणि पात्रांची मांडणी यामुळे नाराजी वाढताना दिसते. अशीच एक मालिका म्हणजे ‘मी संसार माझा रेखिते’. ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या टीकेच्या भोवऱ्यात सापडली आहे.
सन मराठीवरील ही नवी मालिका काही दिवसांपूर्वी सुरू झाली. मात्र सुरुवातीपासूनच कथेत दाखवण्यात येणाऱ्या प्रसंगांवर आक्षेप घेतले जात आहेत. मालिकेत वारंवार स्त्रीवर होणारा अन्याय दाखवला जातो आणि तो मुकपणे सहन करणारी नायिका दाखवल्याने प्रेक्षक संतापले आहेत.
याआधीही एका प्रोमोमुळे मोठा वाद झाला होता. पत्नीने मित्राच्या हातची बासुंदी खाल्ल्याच्या रागातून नवऱ्याने तिला जबरदस्तीने पातेलभर बासुंदी खायला लावल्याचा प्रसंग दाखवण्यात आला होता. त्या दृश्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती.
आता पुन्हा नव्या प्रोमोमुळे वातावरण तापलं आहे. वडिलांना हॉस्पिटलमध्ये भेटून आलेल्या लेकीवर होणारा अन्याय आणि त्याचं क्रूर चित्रीकरण पाहून अनेक प्रेक्षक संतप्त झाले आहेत. “आजच्या काळात असं दाखवणं कितपत योग्य आहे?” असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यामुळे “ही मालिका बंद करा” अशी मागणी थेट प्रेक्षकांकडून केली जात आहे.
सोशल मीडियावर या मालिकेविरोधात संताप व्यक्त होत आहे. एका युजरने दिग्दर्शक आणि कलाकारांवर थेट टीका करत, फक्त पैशांसाठी असं कंटेंट दाखवलं जात असल्याचं म्हटलं. दुसऱ्या युजरने नवरा आणि सासू-सुनेचा छळ दाखवण्यावर आक्षेप घेतला. तर काहींनी थेट “ही फालतू मालिका बंद करा” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
एकूणच ‘मी संसार माझा रेखिते’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या रोषाला सामोरी जात असून पुढे काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
