Atharva Sudame: सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा एक व्हिडिओ त्यानं शेअर केला, पण तोच त्याच्या डोक्यावर संकट बनून आला. व्हिडिओवरून संताप उसळला, ट्रोलिंग वाढलं आणि धमक्याही मिळाल्या. शेवटी अथर्वनं हा व्हिडिओ डिलीट करत जाहीर माफी मागितली.
या प्रकरणात आता ब्राह्मण महासंघानंही उडी घेतली आहे. संस्थेचे पदाधिकारी आनंद दवे यांनी थेट इशारा देत म्हटलं, “सुदामेनं लोकांना हसवावं, मनोरंजन करावं, पण अभ्यास नसलेल्या विषयात पाय घालू नये. पोट भरायचं असेल तर रील बनवत राहा, पण अक्कल शिकवू नका.” दवे पुढं म्हणाले की, “गेल्या शेकडो वर्षांपासून हिंदू धर्माला बाहेरून आलेल्या साखरेच्या नावाखाली विषाचा अनुभव घ्यावा लागलाय. त्यामुळे गणपती कसे करायचे, कुठून घ्यायचे यावर बोलण्याची गरज नाही.”
नेमकं काय आहे हा व्हिडिओ?
अथर्व एका मूर्तिकाराकडे बाप्पाची मूर्ती बघायला जातो. मूर्तिकार मुस्लिम दाखवला आहे आणि त्याचा मुलगा त्याला “अब्बा” म्हणत डब्बा देतो. हे पाहून अथर्व थोडा चकित होतो. त्यानंतर तो दोन वाक्यांत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देतो – “साखर खीर बनवते आणि शीरखुर्माही, वीट देवळातही लागते आणि मशिदीतही.” हे वाक्यच वादाचं मूळ ठरलं.
वाद वाढताच अथर्वनं (Atharva Sudame) माफी मागितली. त्याने आपल्या व्हिडिओत सांगितलं की, “माझा उद्देश कधीच कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. मी आधीही अनेक व्हिडिओ मराठी सणांवर, संस्कृतीवर केले आहेत. पण जर कुणाला दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.”
या घटनेनंतर सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काहींनी अथर्वच्या विचारांना पाठिंबा दिला, तर काहींनी त्याच्यावर संताप व्यक्त केला. पण एवढं नक्की की, एका छोट्या रीलनं प्रचंड वाद निर्माण केला आणि त्याला थेट महासंघाचं लक्ष्यही बनवलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
