झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर नुकताच एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. छोट्या वयात मोठं नाव कमावलेला आणि ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा गौरव मोरे, यावेळी चर्चेत आला तो त्याच्या संघर्षकथेच्या निमित्ताने.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा गौरव आता CHYD मध्ये धमाल करत आहे. मात्र या आठवड्यातील भागात त्याच्यावर खास स्किट सादर करण्यात आलं. त्यात त्याच्या विनोदबुद्धीबरोबरच संघर्षाविषयीच्या कथा मांडल्या गेल्या. स्पर्धकांनी गौरवचं कौतुक करताना म्हटलं – “गौरव मोरे व्हायचं म्हणजे अपमान पचवण्याचं बळ हवं लागतं. खरे-खोटे टोमणे झेलूनही हसत राहण्याचं जिगर त्याच्यात आहे.”
या स्किटदरम्यान उपस्थित सर्व कलाकार भावुक झाले. सूत्रसंचालक अभिजीत खांडकेकरनेही गौरवच्या पाठीवर थाप देत म्हटलं – “आपल्याला कोणी दोन शब्द उलट बोललं तरी इगो दुखावतो. पण स्वतःवरच हसून लोकांचं मनोरंजन करणं, हा तुझाच मोठेपणा आहे गौऱ्या. तुला हॅट्स ऑफ.” त्यानंतर अभिजीतने गौरवला कडकडून मिठी मारली.
सहकलाकारांच्या कौतुकानं भारावलेल्या गौरवनेही मन मोकळं केलं. तो म्हणाला – “हो, मी अपमान पचवतो हे खरंय. पण मी कायम लक्षात ठेवतो की आपला जन्म एकदाच होतो. लोक मस्करी करतील, टोमणे मारतील, पण त्याला मनावर घेण्यात अर्थ नाही. उलट समोरच्या व्यक्तीला आपला मित्र बनवणं जास्त महत्त्वाचं आहे.”
“कधीकधी मलाही वाईट वाटतं, मीही रुसतो. पण लगेच स्वतःला समजावतो – कालचं विसरून आज नवीन सुरुवात करूया. आयुष्य खूप छोटं आहे, ओझं घेऊन जगण्यात काही अर्थ नाही,” असं म्हणत त्याने प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला.
झी मराठीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर गौरवसाठी कौतुकाच्या असंख्य कमेंट्स आल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
