दिग्दर्शक केदार शिंदे यांचा नुकताच प्रदर्शित झालेला झापुक झुपूक हा सिनेमा अपेक्षित यश मिळवू शकला नाही. या चित्रपटात बिग बॉस मराठी ५ फेम सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत होता. मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी राहिल्याने चित्रपट फ्लॉप ठरला.
सिनेमाच्या अपयशावर एका मुलाखतीत केदार शिंदेंनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटलं, “ज्यांनी मला रिजेक्ट केलं त्यांच्याकडेच जास्त अक्कल होती. आता त्यांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय.” त्यांच्या या वक्तव्यावर आता अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण यांनी टीका केली आहे.
वरदने आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणलं, “केदार सर, तुम्ही इतकी वर्षं इंडस्ट्रीत आहात. अपयश नवीन नाही. पण ‘माझ्या मनात काहीतरी खोट असेल’ असं म्हणणं पचत नाही. ट्रेलर, टीझर आणि पोस्टर पाहूनच प्रेक्षकांनी त्या हिरोला रिजेक्ट केलं होतं. हे आधी कधी घडलं नसेल असं नाही. पण तुम्ही ते मान्य करत नाही, हेच खटकतं. जर तुम्हालाच अपयश पचत नसेल तर आम्ही काय करायचं?”
त्यांनी पुढे सांगितलं की, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी विरोध केला. पण जेव्हा लोक म्हणतात की आम्हाला हा हिरो नको आहे, तेव्हा ते स्वीकारायला हवं. बिग बॉसच्या वेळी केदार शिंदेंनीच सांगितलं होतं की सूरज त्यांच्या पुढच्या सिनेमाचा हिरो असेल. आणि रिलीज नंतर लाइव्ह सेशनमध्ये ते म्हणाले की ट्रोलर्सना ते महत्त्व देत नाहीत, पण प्रत्यक्षात त्यांच्याबद्दलच बोलत होते. इतकंच नाही, तर सूरजला ट्रोलर्स काय बोलतात हेही दाखवलं होतं.
तिकीट दरावरही वरदने प्रश्न उपस्थित केला. त्याने सांगितलं, “सूरजच्या फॅन्ससाठी ९९ रुपयांत तिकीट विक्री सुरू होती. ही निर्मात्याची भिकार मानसिकता आहे. मराठी प्रेक्षकाला पैशाचं महत्त्व आहे, पण जर चित्रपट चांगला असेल तर तो साउथ किंवा हिंदी सिनेमांसाठीही तितकेच पैसे देतो. ‘सही रे सही’ नाटक पहिल्या दिवसापासून हाऊसफुल होतं. त्यामुळे एका अपयशामुळे तुमच्या आधीच्या कामावर पाणी सोडू नका.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
