Ranjit Patil: मुंबईतील मराठी नाट्यसृष्टीवर दु:खाचं सावट पसरलं आहे. संवेदनशील दिग्दर्शक रणजित पाटील यांचं रविवारी दुपारी विक्रोळी येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते अवघे ४२ वर्षांचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने नाट्यविश्वासह विद्यार्थी रंगकर्मीही हादरले आहेत.
रणजित पाटील यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. यात अभिनेता आणि जवळचा मित्र समीर खांडेकर याची पोस्ट विशेष लक्ष वेधून घेत आहे.
समीरने मोजक्या शब्दांत एक भावुक पोस्ट शेअर केली. “गन्याऽऽऽ… आपल्या डोळ्यात पाणी आपणच बघणार. आपण कधीच हे म्हटलं नाही, पण आज म्हणतो – ‘साला, नाय पटला रिजल्ट’,” असे शब्द त्याने लिहिले. या पोस्टमधून त्याचं दु:ख स्पष्टपणे जाणवत आहे.
रणजित पाटील हे माटुंगा येथील रुपारेल कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. कॉलेजच्या काळापासूनच ते एकांकिका आणि प्रायोगिक नाटकांमध्ये सक्रिय होते. गेल्या दहा वर्षांत त्यांनी रुपारेल, रुईया आणि पोदार कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत अनेक एकांकिका साकारल्या. मुंबई विद्यापीठ युथ महोत्सव तसेच विविध प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये त्यांच्या दिग्दर्शनाने यश मिळवलं.
सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या ‘जर तरची गोष्ट’ या व्यावसायिक नाटकाचं त्यांनी सह-दिग्दर्शन केलं होतं. याशिवाय मराठी मालिका, चित्रपट आणि ‘काळे धंदे’ वेबसीरिजमध्येही त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. कामात सतत गुंतलेला आणि नवनव्या कल्पनांमध्ये रमलेला हा कलाकार अचानक काळाच्या पडद्याआड गेला, यावर अनेकांचा अजूनही विश्वास बसत नाही. रणजित पाटील यांच्या पार्थिवावर सोमवारी त्यांच्या मूळ गावी कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
