Radhika Apte: मराठी असो किंवा हिंदी, आवडत्या कलाकारांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना नेहमीच रस असतो. अनेक कलाकार आपले विचार मोकळेपणाने मांडतात. स्पष्ट बोलणं आणि थेट मत व्यक्त करणं, यासाठी काही कलाकार ओळखले जातात. सध्या अशीच एक मराठी अभिनेत्री चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर नेहमीच जुनं पुणे आणि नवं पुणे यावर वाद रंगतो. आता या चर्चेत अभिनेत्री राधिका आपटे हिची भर पडली आहे. राधिकाने थेट सांगितलं की, “हिंजवडी मला पुणे वाटत नाही.”
राधिका मूळची पुण्याची आहे. मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. लग्नानंतर ती परदेशात स्थायिक झाली असली, तरी पुण्याशी तिचं नातं अजून तसंच आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्यातला अस्सल पुणेकर पुन्हा समोर आला.
मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिला पुण्याच्या डेटिंग सीनवर तयार होणाऱ्या मिम्सबद्दल विचारण्यात आलं. सुरुवातीला तिला याची कल्पनाच नव्हती. जेव्हा हिंजवडीवर बनणाऱ्या मिम्सबद्दल सांगण्यात आलं, तेव्हा राधिका थेट म्हणाली, “हिंजवडी मला पुणे नाही वाटत. सॉरी, पण मी खूप ओल्ड स्कूल आहे.”
याच गप्पांमध्ये अभिनेता दिव्येंदू शर्मा भोसरीचा उल्लेख करतो. त्यावर राधिका हसत म्हणते की, “भोसरी पण पुणे नाही… कदाचित जिल्ह्यात येईल.” तिचं हे विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
राधिकाच्या या वक्तव्यावर अनेक पुणेकरांनी सहमती दर्शवली आहे. काहींनी तिच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुकही केलंय. काही महिन्यांपूर्वी राधिका आई झाली आहे. कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिच्या ‘साली मोहब्बत’ आणि ‘रात अकेली है’ या वेब सीरिज नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
