Prathamesh Parab: मराठी चित्रपटसृष्टी सध्या जोरात चर्चेत आहे. नवीन चित्रपट सलग प्रदर्शित होत आहेत. त्यात आता प्रेक्षकांसाठी आणखी एक मनोरंजक चित्रपट येत आहे. प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असलेला ‘गोट्या गँगस्टर’ हा चित्रपट 26 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अनेक दिवसांनी प्रथमेश मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटाचा अनोखा टीझर लाँच झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील गाण्यावर आधारित टीझर खूपच लक्षवेधी ठरला आहे.
‘गोट्या गँगस्टर’ हा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिवंगत दिग्दर्शक राजेश पिंजानी यांचा शेवटचा चित्रपट आहे. अन्नपूर्णा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवण्यात आला आहे. अन्नपूर्णा बिरादार, राजेश्री बिरादार आणि संदीप बिरादार यांनी निर्मिती केली असून ऋतुजा पाटील आणि शिव लोखंडे सहनिर्माते आहेत.
चित्रपटात प्रवीण तरडे, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, ऐश्वर्या शिंदे आणि इतर कलाकारांची दमदार टीम दिसणार आहे.
या कथेत मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांच्या आयुष्यातील गमती-जमती दाखवण्यात आल्या आहेत. काही कारणांमुळे त्यांच्यावर किडनॅपिंग करण्याची वेळ येते. त्याच वेळी अनेक वर्षांनी दुबईहून परतणारा डॉन चिमण भाई परत शहरात येतो आणि त्यानंतर सुरू होतात धमाल, विनोदी प्रसंग आणि भन्नाट संवाद.
मनोरंजक कथा, दमदार दिग्दर्शन आणि कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यामुळे हा चित्रपट पाहण्यासारखा ठरणार आहे. राजेश पिंजानी यांच्या अकाली निधनानंतर आता त्यांचा शेवटचा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे, म्हणून हा चित्रपट अधिक खास ठरत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
