Parna Pethe: अभिनेत्री पर्ण पेठे नेहमीच वेगळ्या वाटेवर चालताना दिसते. अभिनयातून ओळख निर्माण केल्यानंतर आता ती नाटकाच्या दिग्दर्शनातही स्वतःचा ठसा उमटवत आहे. ‘समथिंग लाइक ट्रूथ’ या नाटकाच्या निमित्तानं पर्ण दिग्दर्शक म्हणून समोर आली आहे.
या नाटकाचे आतापर्यंत २५हून अधिक प्रयोग झाले आहेत. विशेष म्हणजे, वर्षअखेरीस आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या अनेक मानाच्या महोत्सवांमध्ये या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. याच काळात पर्ण ‘तोत्तोचान’ आणि ‘करुणाष्टके’ या दोन वेगळ्या धाटणीच्या नाटकांमध्येही काम करत आहे.
ज्येष्ठ लेखिका शांता गोखले लिखित ‘समथिंग लाइक ट्रूथ’बद्दल पर्ण म्हणते की, पुणे आणि मुंबईसह विविध ठिकाणी नाटक सादर झालं. आता प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये त्याची निवड होणं महत्त्वाचं आहे. नाटक हिंदी आणि इंग्रजी भाषेत असल्यामुळे ते मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचत असल्याचंही ती सांगते.
या नाटकाची निवड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवांमध्ये झाली आहे. केरळ इंटरनॅशनल थिएटर फेस्टिव्हल, दिल्लीतील भारतीय रंग महोत्सव, कोलकात्याचा मिनर्वा फेस्टिव्हल, गोव्यातील सेरेन्डिपिटी फेस्टिव्हल, बंगळुरूचा रंगशंकरा आणि हब्बा फेस्टिव्हलमध्ये नाटक सादर होणार आहे.
‘तोत्तोचान’ या इन्फोटेन्मेंट प्रकारातील नाटकात पर्ण मध्यवर्ती भूमिकेत आहे. लहान आणि मोठ्या तोत्तोचान या दोन्ही भूमिका ती साकारते. जवळजवळ वर्षभर हे पात्र साकारताना लहान मुलांना दोन-अडीच तास गुंतवून ठेवणं हे मोठं आव्हान असल्याचं ती सांगते. मात्र, मुलं मोबाईलपासून दूर राहून नाटकात रमल्याचं पालकांकडून कळतं, हे समाधान देणारं असल्याचंही ती म्हणते.
अलीकडेच सुरू झालेल्या ‘करुणाष्टके’ या नाटकातही पर्ण महत्त्वाची भूमिका साकारत आहे. नव्वदच्या दशकातील पार्श्वभूमी आणि गंभीर विषयामुळे हे नाटक तिच्यासाठी वेगळा अनुभव ठरत आहे. कलाकार म्हणून वेगवेगळ्या प्रकारची कामं करता येणं हा प्रवास अधिक समृद्ध करत असल्याचं ती स्पष्ट करते.
दिग्दर्शनाबद्दल बोलताना पर्ण म्हणते, “माझ्यातही ती क्षमता आहे” हे मला प्रत्यक्ष नाट्यदिग्दर्शन केल्यानंतर उमगलं. शिस्त, जिज्ञासा आणि सातत्यानं सराव केला, तर कलाकार अपेक्षेपेक्षा जास्त काही करू शकतो, असा तिचा विश्वास आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
