Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत या सप्टेंबरमध्ये खूप रंगतदार स्पर्धा रंगणार आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी तीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यानंतर लगेचच 19 सप्टेंबरला आणखी एक भन्नाट चित्रपट रिलीज होणार आहे.
12 सप्टेंबरला रिलीज होणारे तीन चित्रपट म्हणजे ‘दशावतार’, ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’. तिन्ही चित्रपटांत दमदार कलाकारांची फौज असल्याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.
यानंतर 19 सप्टेंबरला ‘आतली बातमी फुटली’ हा सिनेमा रिलीज होईल. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, कथा भन्नाट आहे. आजोबांनी पत्नीला मारण्याची सुपारी देणं आणि त्या कटात स्वतः पत्नीच सहभागी होणं असा अनोखा ट्विस्ट यात दिसतो. या कथेतील विनोद, सस्पेन्स आणि ड्रामा प्रेक्षकांना खिळवून ठेवतील.
‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, प्रीतम कागणे, भारत गणेशपुरे, विजय निकम, अमोल कागणे असे कलाकार आहेत. दिग्दर्शन विशाल गांधी आणि जैनेश इजारदार यांचे असून निर्मिती विशाल आणि ग्रीष्मा आडवाणी यांनी केली आहे.
तीन सिनेमांबाबत बोलायचं झालं तर, ‘आरपार’ मध्ये ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसतील. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन याची संपूर्ण जबाबदारी गौरव पत्की यांनी सांभाळली आहे.
‘दशावतार’ मध्ये दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, अभिनय बेर्डे यांसारखी मोठी स्टारकास्ट आहे. दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे.
‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटात प्रिया बापट आणि उमेश कामत ही रिअल लाइफ जोडी अनेक वर्षांनी एकत्र झळकणार आहे. त्यांच्यासोबत निवेदिता सराफ आणि गिरीश ओकही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे.
सध्या या चारही चित्रपटांचं प्रमोशन जोरात सुरू आहे. आता प्रेक्षकांची पसंती कोणाला मिळते आणि कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
