Goa Marathi Film Festival: पणजीत रविवारी गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची रंगतदार सांगता झाली. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात दर्जेदार चित्रपट, मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ व नव्या कलाकारांची उपस्थिती आणि प्रीमियर शो यामुळे वातावरण रंगून गेले. गोवा मनोरंजन सोसायटीच्या प्रांगणात झालेल्या या चौदाव्या महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विन्सन ग्राफिक्स आयोजित या सोहळ्यात शेवटच्या दिवशी चार चित्रपटांचे प्रीमियर झाले. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित आणि डॉ. शशी कांबळे निर्मित ‘विद्यापीठ’, तानाजी घाडगे दिग्दर्शित ‘जित्राब’, मिलिंद लेले दिग्दर्शित ‘दृश्य अदृश्य’ आणि अक्षय बाळसराफ दिग्दर्शित ‘परिणती’ हे चित्रपट रसिकांसमोर आले. प्रत्येक चित्रपटाने वेगवेगळा विषय हाताळला आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले.
‘विद्यापीठ’ या चित्रपटात प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या एका स्त्रीची कथा आहे. अंजली पाटील मुख्य भूमिकेत असून छाया कदम आणि ऊर्वी पाटील यांच्या भूमिका उठून दिसतात. प्रीमियरला ज्येष्ठ दिग्दर्शक राजेंद्र तालक उपस्थित होते आणि त्यांनी संपूर्ण टीमचा सन्मान केला.
‘जित्राब’ या चित्रपटात सुहास पळशीकर, भरत गणेशपुरे, शिवाली परब, रोहित माने आणि पार्थ भालेराव यांच्या भूमिका आहेत. ग्रामीण भागातील दुष्काळ, भाकड गाईंची समस्या आणि त्यावरचे राजकारण हा कथानकाचा केंद्रबिंदू आहे. तसेच प्रेमाचा त्रिकोण आणि गाय या संवेदनशील विषयावर चित्रपटाने गंभीर भाष्य केले आहे. चित्रपटातील गाणी कथानकाला पूरक आहेत आणि कलाकारांचा संयत अभिनय प्रेक्षकांना भावतो.
या महोत्सवात विविध विषयांवरील चित्रपट पाहून गोव्याच्या रसिकांनी समाधान व्यक्त केले. दर्जेदार कथा, ताकदीचा अभिनय आणि सामाजिक वास्तवाचे भान दाखवणारे हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
