Dhurandhar Songs: जिओ स्टुडिओज आणि B62 स्टुडिओज प्रस्तुत ‘धुरंधर’ या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर संगीताच्या दुनियेतही मोठा ठसा उमटवला आहे. दमदार कथा आणि कलाकारांच्या अभिनयासोबतच, या चित्रपटाच्या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
धुरंधरचा संपूर्ण अल्बम सध्या जागतिक स्तरावर चर्चेत आहे. या अल्बममधील सर्व 11 गाणी Spotify ग्लोबल टॉप 200 चार्टमध्ये स्थान मिळवून आहेत. एवढंच नाही, तर ही सर्व गाणी Spotify इंडिया टॉप 200 मध्येही झळकत आहेत. त्यामुळे धुरंधरचा अल्बम एक ऐतिहासिक यश मानलं जात आहे.
Spotify ग्लोबल टॉप अल्बम्स चार्टवर धुरंधरने थेट #2 क्रमांक पटकावला आहे. तर Spotify US टॉप अल्बम्स चार्टवर हा अल्बम #5 क्रमांकावर पदार्पण करून बसला आहे. Apple Music India वरही धुरंधरने #1 अल्बमचं स्थान मिळवलं आहे.
गाण्यांच्या बाबतीतही अल्बमची कामगिरी भक्कम आहे. शीर्षकगीत ‘धुरंधर’ #3 क्रमांकावर आहे. ‘इश्क जलाकर’ आणि ‘करवाँ’ ही गाणी #5, तर ‘गहिरा हुआ’ #7 क्रमांकावर पोहोचली आहेत. उर्वरित गाणीही चार्टवर सातत्याने आपली उपस्थिती राखून आहेत.
बॉलिवूडमधील कोणत्याही चित्रपटाने यापूर्वी अशी कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. त्यामुळे आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर हा Spotify ग्लोबल चार्टवर मोठं यश मिळवणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक ठरला आहे. जगभरातील श्रोते ही गाणी ऐकत असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होतं.
या यशावर प्रतिक्रिया देताना संगीतकार आणि सुपर प्रोड्युसर शाश्वत सचदेव म्हणाले की, त्यांनी कधीही या अल्बमकडे आकड्यांच्या स्पर्धेसारखं पाहिलं नाही. विश्वास, मैत्री आणि संगीतावरील प्रेमातून हा अल्बम तयार झाला, असं त्यांनी सांगितलं. सर्व गाणी चार्टवर पोहोचणं आणि काही गाण्यांनी सर्वोच्च स्थान मिळवणं, हे अत्यंत नम्र करणारे असल्याचं त्यांनी नमूद केलं.
धुरंधर हा एक हाय-ऑक्टेन अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती आदित्य धर यांनी केली आहे. ज्योती देशपांडे आणि लोकेश धर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही दमदार सुरुवात केली असून त्याची घोडदौड अजूनही सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
