Abhang Tukaram Movie: मराठी प्रेक्षकांसाठी लवकरच एक वेगळा अनुभव घेऊन येत आहे ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट. संत तुकाराम महाराजांचं जीवनपट अनेकदा पडद्यावर झळकलं आहे. मात्र त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्तिरेखा – आवली – फार कमी वेळा दिसली. आता प्रथमच या चित्रपटात तिचं वास्तवाशी जोडलेलं चित्रण साकारलं जाणार आहे. ही भूमिका करणार आहे ताकदीची अभिनेत्री स्मिता शेवाळे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि पटकथा लेखन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘सुभेदार’सारखे ऐतिहासिक चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांनी यावेळी वारकरी परंपरेतील एका स्त्रीपात्राला नवा दृष्टिकोन दिला आहे.
तुकाराम महाराजांचा आध्यात्मिक प्रवास समाजाला दिशा देणारा ठरला. पण त्या प्रवासामागे आवलीचं योगदानही तितकंच मोठं आहे. संसारातील जबाबदाऱ्या, संघर्ष आणि वास्तवाचे ओझे सांभाळत तिने पतीच्या अध्यात्माला पायाभूत आधार दिला. तिच्या संवादातला राग वास्तवाचं भान देणारा आहे, तर तक्रारीत दडलेलं प्रेम आणि काळजी जाणवते.
चित्रपटात स्मिता शेवाळेने साकारलेली आवली एकाच वेळी कठोर, प्रेमळ आणि संघर्षशील वाटते. तिच्या अभिनयातून प्रेक्षकांना एक जिवंत आणि भावनिक व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे.
‘अभंग तुकाराम’ ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, या चित्रपटातून संत तुकारामांच्या आयुष्यातील आवलीचं स्थान प्रेक्षकांना नव्या नजरेतून पाहायला मिळेल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
