‘बंधू’चा ट्रेलर प्रदर्शित! उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींच्या अभिनयाची पाहायला मिळाली झलक

दोन भावांच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट

मराठी चित्रपटसृष्टीत कौटुंबिक नात्यांवर आधारित आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘बंधू’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. दोन भावांमधील प्रेम, भांडणं, रुसवे-फुगवे आणि एकमेकांसाठी केलेला त्याग या नात्याचे विविध पैलू ट्रेलरमधून पाहायला मिळतात. हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरमध्ये दोन भावांमधील नात्यातील गोडवा आणि संघर्ष दोन्ही पाहायला मिळतात. कधी एकमेकांशी भांडणारे, कधी रुसणारे, तर कधी स्वतःपेक्षा भावाच्या आनंदाचा विचार करणारे हे भाऊ प्रेक्षकांना भेटणार आहेत. कितीही मतभेद झाले किंवा दुरावा निर्माण झाला, तरी एकमेकांबद्दलचं प्रेम कायम राहतं, हा भावनिक धागा चित्रपटाच्या कथेतून मांडण्यात आला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त आहे.

उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी भावांच्या भूमिकेत

रजत बेदी प्रस्तुत करत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केले आहे.

‘आटपाडी नाईट्स’ आणि ‘सरला एक कोटी’ या चित्रपटांनंतर नितीन सुपेकर पुन्हा एकदा मानवी नात्यांवर आधारित कथा घेऊन येत आहेत. ‘बंधू’मध्ये उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी दोन भावांची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या सहचारिणींच्या भूमिकेत मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे दिसणार आहेत.

या चित्रपटात रेणुका दफ्तरदार, स्मिता तांबे, श्रीकांत यादव, विठ्ठल काळे, यशपाल सरणात, ज्ञानरत्न अहिवळे, चैतन्य सोलणकर, श्रीपाद पानसे, बालकलाकार शौर्य पाटील, देवा गाडेकर, वर्षा अजित, प्रशांत जाधव, अनिल कांबळे आणि प्रणाली भालेराव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

रजत बेदी यांनी व्यक्त केल्या भावना

चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता रजत बेदी यांनी ‘बंधू’च्या कथेबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांच्या मते, चांगल्या कथा भाषेच्या सीमा ओलांडून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. ‘बंधू’ची कथा मनाला स्पर्श करणारी असून, या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीशी प्रस्तुतकर्ता म्हणून जोडले जाणे हा त्यांच्यासाठी खास अनुभव आहे. उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी आणि इतर कलाकारांनी आपल्या अभिनयातून भावंडांमधील नात्याचे भावविश्व जिवंत केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार रामदास आठवले उपस्थित होते. त्यांनी ट्रेलरचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

गुरू ठाकूर आणि वैभव देशमुख यांची गीते

‘बंधू’मधील गाण्यांना गुरू ठाकूर आणि वैभव देशमुख यांनी शब्द दिले आहेत, तर विजय नारायण गवंडे यांनी संगीतबद्ध केले आहे. अजय-अतुल, अमिता घुगरी आणि शमिका भिडे या गायकांनी गाण्यांना आवाज दिला आहे. चित्रपटातील गाण्यांचे संगीत हक्क झी म्युझिककडे आहेत.

चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन अविनाश नलावडे आणि नील राठोड यांनी केले आहे. वेशभूषेची जबाबदारी कीर्ती जंगम यांनी, तर रंगभूषा समीर रमेश कदम यांनी सांभाळली आहे. हर्षद आत्माराम गायकवाड यांनी छायांकन केले असून, अतिरिक्त छायांकन योगेश कोळी यांचे आहे. वैभव दाभाडे आणि वासिम मुल्ला यांनी संकलन केले आहे, तर साहसदृश्यांची जबाबदारी बब्बू खन्ना यांनी सांभाळली आहे.

दोन भावांमधील प्रेम, जिव्हाळा, मतभेद आणि त्याग यांची कथा सांगणारा ‘बंधू’ चित्रपट २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांची जोडी या चित्रपटात कोणत्या प्रकारे भावंडांचं नातं उलगडते, हे पाहण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page