‘जयंती २’ येत्या ११ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. टीझरवरून यावेळी चित्रपटात शिक्षण व्यवस्थेतील भेदभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर भाष्य केलं जाणार असल्याचं दिसत आहे.
चित्रपटात ‘संत्या’ची भूमिका साकारणारा अभिनेता ऋतुराज वानखेडे पुन्हा एकदा मध्यवर्ती भूमिकेत आहे. टीझरमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रींच्याही भूमिका महत्त्वाच्या असल्याचं जाणवतं. ग्रामीण भागातील एका विद्यार्थिनीला शिक्षण घेताना कोणत्या प्रकारच्या भेदभावाला सामोरं जावं लागतं आणि त्यातून कोणते प्रश्न निर्माण होतात, याभोवती चित्रपटाची कथा फिरत असल्याचं टीझरवरून स्पष्ट होतं.
‘जयंती २’ची निर्मिती मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओने केली आहे. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांनी केलं आहे. ऋतुराज वानखेडेसोबत पायल जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे आणि मानसी सुभाष हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
चित्रपटाच्या तांत्रिक टीममध्येही अनुभवी कलाकारांचा समावेश आहे. संजीवकुमार हिल्ली यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे, तर फैसल महाडिक यांनी संकलन केलं आहे. डॉ. सुहास अंबादे, सुहास मुंडे आणि सौरभ गुरू यांनी गीतलेखन केलं असून ओंकारस्वरूप यांनी संगीत दिलं आहे. पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचं आहे.
‘जयंती’ हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा तरुणांवर होणारा प्रभाव आणि त्यातून होणारा सकारात्मक बदल या विषयावर पहिल्या भागाची कथा आधारित होती. वेगळ्या विषयामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये चर्चा निर्माण केली होती. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.
आता ‘जयंती २’मधून शिक्षण व्यवस्थेतील भेदभावाचा मुद्दा मांडण्यात येणार आहे. ११ सप्टेंबरची रिलीज डेट जवळ येत असताना चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. दमदार कलाकार आणि सामाजिक विषय यामुळे टीझरनंतर ‘जयंती २’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
