1990 आणि 2000 च्या दशकात प्रीती झिंटाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘दिल से’, ‘सोल्जर’, ‘कल हो ना हो’, ‘कोई… मिल गया’, ‘वीर-झारा’ आणि ‘कभी अलविदा ना कहना’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या.
2016 मध्ये अमेरिकन नागरिक जीन गुडइनफ यांच्याशी विवाह केल्यानंतर प्रीतीने अभिनयातून काही काळ विश्रांती घेतली. लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित केले. नोव्हेंबर 2021 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून ती जुळ्या मुलांची आई झाली. जय आणि जिया अशी तिच्या मुलांची नावे आहेत. अभिनयापासून दूर असली तरी क्रिकेट आणि इतर व्यावसायिक कामानिमित्त ती भारतात येत असते.
आता ‘बटवारा 1947’ या चित्रपटातून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
1947 मधील भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात एका कुटुंबाच्या आयुष्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. फाळणीदरम्यानचा हिंसाचार, भीती, सक्तीचे स्थलांतर आणि त्यातून निर्माण झालेल्या भावनिक वेदना यांचे प्रभावी चित्रण ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. कठीण परिस्थितीतही जपली गेलेली माणुसकी हा या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे.
या चित्रपटात प्रीती झिंटासोबत सनी देओल, शबाना आझमी, करण देओल, अली फझल आणि अभिमन्यू सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली असून, विशेषतः प्रीती झिंटाच्या पुनरागमनाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
