Bigg Boss Marathi 6: सध्या ‘बिग बॉस मराठी 6’ गाजवत असलेली अभिनेत्री तन्वी कोलते पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे तिचे गंभीर आरोप. तिने झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मीनिवास’ च्या सेटवर तिला मिळालेल्या वागणुकीबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.
एका मुलाखतीत तन्वी म्हणाली की, सेटवर तिची किंमत केली जात नव्हती. “एका व्यक्तीने मला थेट सांगितलं, तू कचरा आहेस, तू काहीच नाहीस. ते शब्द आजही माझ्या मनात आहेत. पण त्याच शब्दांनी मला उभं राहण्याची ताकद दिली,” असं ती म्हणाली.
ती पुढे म्हणते की, तिला लहान कलाकार म्हणून कमी लेखलं जात होतं. “मी कॅरेक्टर रोल करते म्हणून माझ्याशी वेगळं वागलं जायचं. समजावण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण चार लोकांसमोर अपमान करणं चुकीचं आहे,” असं ती म्हणाली.
तन्वीने सेटवरील बॉडीशेमिंगचाही अनुभव सांगितला. “मी अंगभर कपडे घालून यायचे. तरीही कपड्यांवरून माझ्या शरीरावर टीका केली जायची. यावर मी अनेकदा आवाज उठवला,” असं ती म्हणाली.
तिचा आणखी एक आरोप म्हणजे सीन तयार नसताना उशीर झाल्याचं खापर तिच्यावर फोडलं जायचं. “सीन आधीच समजावून देऊनही माझ्यामुळे वेळ जातोय असं दाखवलं जायचं,” असं तिने सांगितलं.
तन्वी म्हणते की, तिला सेटवर स्वतःची किंमत नसल्यासारखं वाटायचं. त्यामुळेच तिने अखेर मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. “मी खरी कारणं लिहून मेल पाठवला आणि प्रोजेक्ट सोडला,” असं ती स्पष्टपणे म्हणाली.
आज तीच तन्वी ‘बिग बॉस मराठी 6’ मध्ये दमदार खेळ करत आहे आणि प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
