Dharmendra Passes Away: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं सोमवारी, 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचार घेत असताना त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून घरी हलवण्यात आलं होतं. तिथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं देओल कुटुंबावर आणि चाहत्यांवर मोठं दुःख कोसळलं आहे.
त्यांची पत्नी हेमा मालिनी, मुलं सनी देओल, बॉबी देओल, तसेच ईशा आणि अहाना देओल असा मोठा परिवार त्यांच्या मागे आहे. धर्मेंद्र यांच्या जाण्यानं केवळ कुटुंबच नव्हे तर संपूर्ण बॉलिवूड शोकाकूल आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर श्रद्धांजलींचा ओघ सुरू आहे.
धर्मेंद्र हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते. प्रेक्षकांनी त्यांना ‘ही-मॅन’ म्हणूनज ओळखलं. त्यांच्या अभिनयातील साधेपणा, अॅक्शन आणि संवादफेक यामुळे ते अनेक दशकं सुपरस्टार राहिले.
अलीकडेच त्यांच्या आगामी “इक्कीस” चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला होता. या पोस्टरनं चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली होती. हा देशभक्तीपर चित्रपट असून तोच धर्मेंद्र यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रोजेक्ट ठरला.
निर्माता करण जोहर यांनी त्यांच्या निधनावर पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली. त्यांनी धर्मेंद्र यांना “एक युगाचा अंत” असे शब्दांत आठवलं. त्यांच्या मते, धर्मेंद्र हे देखणे, मोठ्या पडद्यावर प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले आणि मनाने फार मोठे व्यक्ती होते. त्यांच्या जाण्यानं फिल्म इंडस्ट्रीत कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं.
धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटातून कारकीर्द सुरू केली. “शोले”, “धरमवीर”, “मेरा गाव मेरा देश”, “यादों की बारात”, “ड्रीम गर्ल” अशा अनेक सुपरहिट चित्रपटांनी त्यांनी चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली. त्यांनी विजयता फिल्म्सच्या माध्यमातून अनेक चित्रपटांची निर्मितीही केली.
त्यांना 2012 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या “घायल” चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाले, तर त्यांना स्वतःला 1997 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
