ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या संतपरंपरेवरील लेखनावर आधारित ‘कोऽहम्’ या अनोख्या नाट्यमय सादरीकरणाला पुण्यात प्रेक्षकांसमोर सादर होण्याची संधी मिळते आहे. १२ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रात्री ९ वाजता हा कार्यक्रम होणार असून, यात मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे आणि शिवराज वायचळ एकत्र रंगमंचावर दिसणार आहेत.
‘कोऽहम्’ म्हणजेच “मी कोण?” हा प्रश्न नेहमीच प्रत्येकाला पडतो. हाच विषय नाटक, अभिवाचन, नृत्य आणि संवाद यांच्या मिश्रणातून प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, जिजाऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजच्या काळाशी जोडून यात मांडले आहेत.
शिवानी रांगोळे म्हणाली, “हा अनुभव कलाकार म्हणून खूप समृद्ध करणारा ठरला. संत ज्ञानेश्वरांच्या काळातील भाषा आत्मसात करणं मोठं आव्हान होतं. गोनीदांच्या लेखनाचा आब राखत ते आजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ही एक वेगळीच शिकवण होती.”
ती पुढे म्हणाली की, आजच्या पिढीला गोंधळ, सोशल मीडिया, ग्लोबलायझेशन यामध्ये स्वतःचा शोध घ्यायचा आहे. संतसाहित्य आणि विचार यातून त्यांना सहज उत्तरं मिळू शकतात. हे सांगताना नाटकात काही ठिकाणी हलकं-फुलकं विनोदाचंही मिश्रण आहे.
मुंबई आणि पुणे अशा दोन्ही ठिकाणी या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कॉलेजमधील तरुणांनी गो. नी. दांडेकर यांची पुस्तकं शोधायला सुरुवात केली, हीच या सादरीकरणाची खरी कमाई असल्याचं शिवानीनं सांगितलं.
या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फुलवा खामकर यांनी बसवलेली दोन नृत्यप्रस्तुतीदेखील प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
