Shivani Sonar: झी मराठीवरील ‘तारिणी’ मालिकेत प्रेक्षकांना थरारक एपिसोड पाहायला मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास भाग तयार करण्यात आला असून त्यात तारिणीवर मोठी जबाबदारी येते. न्यायप्रिय आणि नियमांवर ठाम असलेल्या न्यायमूर्ती चारुदत्त देसाई यांच्या सुरक्षेची जबाबदारी तारिणीवर सोपवली जाते. विसर्जन मिरवणुकीदरम्यानच त्यांची हत्या होणार असल्याची माहिती मिळताच सगळा खेळच रंगतो.
या सीन्सचं वैशिष्ट्य म्हणजे शूटिंग प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीत करण्यात आलं. अभिनेत्री शिवानी सोनार, जी तारिणीची भूमिका साकारते, हिने गर्दीत हे सीन शूट केले. त्या अनुभवाबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, “रिअल लोकेशनवर शूट करणं खूपच आव्हानात्मक होतं. गर्दीत वेळ सांभाळणं आणि सुरक्षेचं भान ठेवणं खूप कठीण होतं. पण आमची टीम आणि दिग्दर्शकांची प्लॅनिंग अफलातून होती. सिनेमात पाहिलेले अॅक्शन सीन टीव्हीवर प्रेक्षकांना अनुभवायला मिळतील.”
वैयक्तिक भावना व्यक्त करताना ती पुढे म्हणाली, “मी शिवानी म्हणून बोलतेय – मला गणपती विसर्जन पहायला आवडत नाही. मला त्रास होतो, डोळ्यात पाणी येतं. पण शूट करताना मात्र खूप मजा आली. लोक तारिणी म्हणून माझं नाव घेत होते, भेटत होते, प्रेम दाखवत होते. तो अनुभव खूप खास होता.”
या विशेष भागात अभिनेता उमेश जगताप न्यायमूर्ती चारुदत्त देसाईंची भूमिका साकारणार आहेत. भक्ती आणि कर्तव्याचा संगम दाखवणारा हा एपिसोड प्रेक्षकांसाठी भावनिक आणि थरारक अनुभव घेऊन येणार आहे. ‘तारिणी’ मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता झी मराठीवर प्रसारित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
