Kishor Kadam: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि कवी ‘सौमित्र’ म्हणून ओळखले जाणारे किशोर कदम यांच्या अंधेरीतील घरावर संकट आलं आहे. फेसबुकवर त्यांनी स्वतः ही बाब मांडत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांकडे मदतीची विनंती केली.
किशोर कदम यांचं घर अंधेरीतील चाकाला परिसरातील हवा महल सोसायटीत आहे. येथील पुनर्विकास प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर फसवणूक आणि भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. या वादात त्यांच्यासह 23 सभासदांचं घर धोक्यात आलेलं आहे. किशोर कदम यांच्या मते, सोसायटी कमिटीने सभासदांना अंधारात ठेवून महत्वाची कागदपत्रं लपवली आणि बिल्डर, पीएमसी यांच्या संगनमताने निर्णय घेतला.
त्यांनी स्पष्ट केलं की, सोसायटीला SRA/स्लम डेव्हलपमेंट योजनेखाली आणण्याचा निर्णय नुकताच त्यांच्या लक्षात आला, आणि तोही सभासदांना न सांगता. हे सर्व 33(11) आणि 33(12)B या DCPR नियमांतर्गत होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
या पोस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिसाद देत सांगितलं की, सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे सीईओ महेंद्र कल्याणकर यांना त्यांनी हा विषय पाहण्याचे निर्देश दिले असून, ते किशोर कदम यांच्याशी संपर्कात राहतील.
किशोर कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “मेजॉरिटीच्या नावाखाली मूर्खपणाचे निर्णय घेऊन जागरूक सभासदांचा आवाज दाबला जातो. माहिती लपवून, व्हॉट्सअॅप ग्रुपमधून वेगळं करून आणि खोटं चित्र उभं करून एखाद्या सदस्याला एकटा पाडलं जातं. हेच आम्हाला भोगावं लागतंय. ही शहरी एट्रोसिटी आहे, पण कायद्यात याविरुद्ध कोणतीच तरतूद नाही.”
त्यांनी सरकारला आवाहन केलं की, अशा प्रकरणांत सामान्य माणूस वर्षानुवर्षे लढत बसतो, त्यामुळे तातडीने हस्तक्षेप करून ही समस्या सोडवावी. “मी एक कलाकार म्हणून नव्हे, तर सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं घर वाचवण्याची विनंती करतो,” असं त्यांनी शेवटी म्हटलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
