Priya Bapat: ॲमेझॉन प्राईमवर लवकरच येणाऱ्या ‘अंधेरा’ या भयपट वेबमालिकेत प्रिया बापट एक नवीन अवतार घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच या मालिकेचा ट्रेलर समाजमाध्यमांवर प्रदर्शित झाला असून, त्याने चाहत्यांमध्ये भीती आणि उत्सुकता दोन्ही वाढवल्या आहेत.
या मालिकेत प्रियाने पहिल्यांदाच पोलिसाची भूमिका साकारली आहे. आणि खास म्हणजे ही तिची पहिलीच भयपट शैलीतील भूमिका आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रिया, या वेळी पूर्ण वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ‘अंधेरा’च्या ट्रेलरमधील भीतीदायक दृश्ये आणि थरारक वातावरणामुळे, कथानकाविषयी अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत.
या नव्या भूमिकेबद्दल प्रिया बापट म्हणाली,
“पहिल्यांदाच मी भयपट वेबमालिकेत काम केलं आणि हा अनुभव खूप वेगळा ठरला. चित्रीकरणाचा मोठा भाग रात्री झाला, पण पटकथा इतकी रोचक होती की भीती किंवा ताण जाणवला नाही. मी वाचलेल्या पटकथांपैकी ही उत्तम वाटली.”
तिने पुढे सांगितले की, ही कथा खूप वेगळ्या पद्धतीने उलगडते. यात ॲक्शन आणि भीतीदायक दोन्ही प्रकारची दृश्ये आहेत, त्यामुळे कलाकार म्हणून ही भूमिका करताना एक वेगळाच आनंद मिळाला.
आतापर्यंत प्रिया वकील, राजकारणी यांसारख्या भूमिका करत आली आहे. पण या वेळी ती पूर्णपणे वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आहे. मराठीसह हिंदी चित्रपट आणि वेबमालिकांमध्ये तिला मिळालेलं प्रेम ती या नव्या भूमिकेतही मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते.
‘अंधेरा’चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये कथानकाविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. पुढे ही कथा कुठे नेणार? रहस्य कसं उलगडणार? याची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या प्रदर्शना नंतरच मिळणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
