Kshitij Patwardhan: अभिनय बेर्डे, रेणुका शहाणे आणि ऋता दुर्गुळे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘उत्तर’ हा मराठी सिनेमा सध्या चर्चेत आहे. 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमासमोर आधीपासून गाजत असलेला ‘धुरंधर’ आणि नुकताच रिलीज झालेला ‘अवतार’ अशी मोठी आव्हानं होती. तरीही ‘उत्तर’ने बॉक्स ऑफिसवर आपली जागा टिकवून ठेवली आहे.
मुंबई, पुण्यासह राज्यभरातून सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे दुसऱ्या विकेंडला चित्रपटाचे शोज वाढवण्यात आले आहेत. मोठ्या हिंदी आणि इंग्रजी सिनेमांच्या गर्दीतही ‘उत्तर’ प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, हेच या यशाचं मोठं कारण मानलं जात आहे.
या पार्श्वभूमीवर लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन याने सोशल मीडियावर एक सकारात्मक पोस्ट शेअर केली आहे. ‘यापुढे मराठी मार खाणार नाही!’ असे ठामपणे सांगत त्याने स्पर्धेला कसं सामोरं जायचं, याचा अनुभव मांडला आहे. ‘उत्तर’ हा त्याचा पहिलाच दिग्दर्शकीय सिनेमा आहे.
क्षितिजने पोस्टमध्ये स्पष्ट केलं की, शोज मिळत नाहीत अशी तक्रार करायची नाही किंवा मराठी विरुद्ध हिंदी असा मुद्दा उभा करायचा नाही, हे त्याने सुरुवातीलाच ठरवलं होतं. जिथे शोज मिळतील, तिथे ते कसे चालतील यावर लक्ष केंद्रित केलं. सिनेमाला मिळालेला शहरांमधील प्रतिसाद पाहून त्यांनी आणखी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थिती लावली.
परीक्षणं सकारात्मक आली, आठवड्याच्या दिवसांतही ऑक्युपन्सी चांगली राहिली. सिनेमाची एशियन फेस्टिव्हल निवड झाली आणि बुक माय शोवरही चांगले रेटिंग मिळाले. दोन मोठ्या सिनेमांशी चाललेली ही लढत सकारात्मक पद्धतीने स्वीकारल्याचं क्षितिजने नमूद केलं.
दुसऱ्या विकेंडला सहा ठिकाणी शोज वाढले असून, ‘मराठी फॅमिली फिल्म’ म्हणून ‘उत्तर’चं पोझिशनिंग केल्याचा फायदा होत असल्याचं दिसतंय. क्षितिजच्या मते, अशी परिस्थिती पुढेही अनेक मराठी सिनेमांवर येईल. मात्र स्वतःच्या कंटेंटवर विश्वास ठेवून, हुशारीने आणि दिवसागणिक लढत राहिलं, तर मराठी सिनेमा टिकून राहील.
“कितीही मोठा हिंदी किंवा इंग्रजी सिनेमा येऊ दे, मराठी सिनेमा मार खाणार नाही. द फाइट इज ऑन!” असा ठाम संदेश त्याने या पोस्टमधून दिला आहे. क्षितिजच्या या भूमिकेला स्वप्नील जोशी, अभिनय बेर्डे यांच्यासह अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला असून, चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
धिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
