स्टार प्रवाहवरील ‘नशिबवान’ मालिकेतून अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर परतणार आहे. याआधी ‘बे दुणे दहा’ मालिकेत तिनं प्रभावी भूमिका केली होती, पण आता ती पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे.
सोनाली गेल्या काही वर्षांत चित्रपट, वेबसीरिज आणि स्वतःच्या निर्मिती संस्थेमुळे व्यस्त होती. मालिकांपासून दुरावली असली तरी तिच्या मनात परत एकदा छोट्या पडद्यावर काम करण्याची इच्छा कायम होती. अखेर जवळपास दहा वर्षांनंतर ती पुन्हा मालिकेत दिसणार आहे, तेही पहिल्यांदा खलनायिकेच्या रुपात.
या मालिकेत सोनालीची व्यक्तिरेखा आहे उर्वशी – दिसायला सुंदर पण स्वार्थी, स्वतःच्या सौंदर्यावर गर्व करणारी आणि हवं तसं साध्य करण्यासाठी कोणताही मार्ग निवडणारी. तिच्या आयुष्यात भावनांना जागाच नाही, असं व्यक्तिमत्व ती या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आणणार आहे.
नशिबवानचा श्रीगणेशा गणेशोत्सवाच्या धामधूमीत होत आहे. त्यामुळे हा सण सोनालीसाठी खास ठरणार आहे. ती म्हणते, “टीव्हीवर माझं करिअर सुरु झालं होतं, त्यामुळे छोटा पडदा नेहमी जवळचा वाटतो. स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्ससोबत काम करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. उर्वशी माझ्या स्वभावाच्या अगदी उलट आहे, म्हणून ही भूमिका करताना कस लागतंय पण मजाही येतेय.”
सध्या ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ ही मालिका गाजत असताना, ‘नशिबवान’ आणि ‘लपंडाव’ या नव्या मालिकांचे प्रोमो महाराष्ट्रभर चर्चेत आहेत. त्यात सोनाली खरेच्या कमबॅकमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी मनोरंजनविश्वातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. फॅक्ट-बेस्ड लेखन आणि अपडेटेड माहिती देणं हेच माझं ध्येय आहे.
