लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि कॉमेडियन सारंग साठ्ये लग्नबंधनात अडकला आहे. त्याची जोडीदार पॉला मॅकग्लिनसोबत त्याने साध्या पद्धतीने विवाह केला. अनेक वर्षांच्या नात्याला त्यांनी अखेर अधिकृत स्वरूप दिलं.
दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. “हो, आम्ही लग्न केले आहे. लग्न आमच्यासाठी कधी प्राधान्याचं नव्हतं, पण मागचं वर्ष कठीण गेलं. जगभर वाढणारा द्वेष आणि संघर्ष पाहून आम्हाला पहिल्यांदाच वेगळं होऊ अशी भीती वाटली. पण प्रेम नेहमीच जिंकतं. आमच्या नात्याला अधिक घट्ट करण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी आम्ही लग्न केलं,” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं.
हा विवाह अगदी खासगी ठेवण्यात आला होता. जवळचे नातेवाईक आणि काही मित्र यांच्यासमोर झाडाखाली साधेपणाने सोहळा पार पडला. गाणी, गप्पा आणि वचनांनी हा क्षण संस्मरणीय बनला. “ही आमची छोटीशी प्रेमकहाणी आहे. प्रेम नेहमीच विजय मिळवेल,” असं त्यांनी पुढे म्हटलं.
सारंग आणि पॉला यांची पहिली भेट २०१२ मध्ये टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली. पॉला त्या वेळी एका चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होती आणि त्याच चित्रपटात सारंगचीही भूमिका होती. तिथूनच त्यांच्या ओळखीने मैत्रीचं, आणि पुढे प्रेमाचं रूप घेतलं.
त्यांचं लोकप्रिय युट्यूब चॅनल ‘भारतीय डिजिटल पार्टी’ (BhaDiPa) आधीच तरुणांमध्ये हिट आहे. आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील ही नवी सुरुवात चाहत्यांसाठीही आनंदाची ठरली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
